
नागपूर : भाजपचे विधान परिषदेचे सदस्य परिणय फुके यांच्या घरातील वाद पुन्हा चर्चेत आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार) खासदार सुप्रिया सुळे यांनी परिणय फुकेंच्या दिवंगत भावाच्या पत्नीची केस आम्ही ताकदीने लढत असल्याचे आज पत्रकार परिषदेत सांगितले. परिणय फुके यांच्या लहान भावाची पत्नी प्रिया फुकेंविरुद्ध कौटुंबिक हिंसाचार झाला आहे. त्यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेश अध्यक्ष रोहिणी खडसे नागपूर येथे येऊन गेल्या. आम्ही हे प्रकरण मजबुतीने लढत आहोत, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
रमेश फुके आणि त्यांचा आमदार मुलगा परिणय फुके यांनी भाऊ संकेत फुकेला गंभीर आजार असल्याचे लपवून त्याचे प्रियाशी लग्न लावून दिले. संकेतच्या निधनानंतर फुके कुटुंबीयांनी प्रियाला घराबाहेरसुद्धा जाण्यास मनाई केली. त्यांनी प्रियाकडून एटीएम, बँकेचे पासबुक, दागिने जबरदस्तीने काढून घेतले. युनियन बँकेच्या धरमपेठ शाखेच्या खात्यात चार कोटी रुपये होते. मात्र, त्यातील ३.३० कोटी रुपये बनावट स्वाक्षरी करत रमेश फुके यांच्या खात्यात वळते केले, असा आरोप सबाने यांनी केला. याबाबत तक्रार केल्यानंतर “आमचे कुटुंब सधन असून आम्ही राजकीय दबावाने काहीही करू शकतो. तू शांत राहिली नाहीस तर तुझ्या आई आणि बहिणीवर अत्याचार करण्यात येईल,” अशी धमकी सासऱ्यांनी दिली, असा आरोप प्रिया फुके यांचा आहे.
प्रिया फुके यांच्या तक्रारीवरुन डॉ. रमा फुके यांच्या घरातील नोकर चिंटू गजभिये याच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणामुळे आमदार परिणय फुकेंच्या घरातील कौटुंबिक वाद पोलीस ठाण्यात पोहचला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, परिणय फुके यांच्या आई डॉ. रमा रमेश फुके (६८, हिलटॉप) यांनी अंबाझरी पोलीस ठाण्यात लेखी तक्रार करताच अंबाझरी पोलिसांनी क्षणाचाही विलंब न लावता प्रिया फुकेंविरोधात गुन्हा दाखल केला.