महाराष्ट्रमहाराष्ट्र ग्रामीण

अग्निशमन दलात अत्याधुनिक ८ नवीन फायर टेंडर दाखल

शहरातील अग्निशमन व आपत्कालिन सेवा होणार अधिक सक्षम

नागपूर, : नागपूर महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागामार्फत शहरातील आगीच्या घटनांवर अधिक प्रभावीपणे नियंत्रण मिळवण्यासाठी विविध क्षमता असलेले ८ नवीन फायर टेंडर अग्निशमन ताफ्यात दाखल झाले आहे. तर उर्वरीत ६ मिनी फायर टेंडर लवकरच सेवेत दाखल होणार आहेत. शहरात नव्याने सुरू झालेल्या वाठोडा, पुनापूर व पाचपावली अग्निशमन केंद्राकरीता १४ नवीन अग्निशमन गाड्या (फायर टेंडर) सेवा देणार आहेत. यामुळे महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या क्षमतेत लक्षणीय वाढ झालेली आहे. उंच तसेच दूरवरून पाण्याचा मारा करून आग तात्काळ नियंत्रणात आणण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश मिळणार आहे.

मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नुकतेच या फायर टेंडरचे लोकार्पण झाले. यावेळी राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी आणि अतिरिक्त आयुक्त श्रीमती वसुमना पंत, अतिरिक्त आयुक्त श्रीमती वैष्णवी बी. अतिरिक्त आयुक्त श्री. अजय चारठाणकर यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य अग्निशमन अधिकारी श्री. तुषार बाराहाते यांच्या नेतृत्वात अग्निशमन विभागाचे आधुनिकीकरण केले जात आहे. या अंतर्गत नवीन फायर टेंडर अग्निशमन दलात दाखल झाल्याने अग्निशमन विभागाला अधिक बळ मिळाले आहे.

 

नागपूर महानगरपालिकेच्या अग्निशमन व आपत्कालिन सेवा विभागाने खरेदी केलेल्या १४ फायर टेंडरमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या आणि क्षमतांचा समावेश आहे. याची किंमत १६ कोटी ४९ लाख रुपये इतकी आहे. १६ हजार लिटर पाणी वाहून नेण्याची क्षमता असलेले ५ वॉटर बाउजर खरेदी करण्यात आले आहे. यामध्ये १००० फूट अंतरापर्यंत पाण्याचा मारा करण्याची सुविधा आहे. ३५ फूट उंच शिडी, आवश्यक साहित्याने सुसज्ज साहित्यामुळे आगीवर नियंत्रण आणणे सोपे जाणार आहे. याशिवाय ५ हजार लिटर पाणी वाहून नेण्याची क्षमता असलेले ३ फायर टेंडर खरेदी करण्यात आले आहे. जवळपास १००० फूट पाईप तसेच ३५ फूट उंच शिडी, आवश्यक साहित्याने सुसज्ज अशी हे फायर टेंडर आहे. तर ६ मिनी फायर टेंडरची पाणी वाहून नेण्याची क्षमता २ हजार लीटर एवढी आहे. हे मिनी फायर टेंडर खरेदी करण्यात आले आहे. ५०० फूट पाईप, ३५ फूट उंच शिडी, आवश्यक साहित्याने सुसज्ज अशी मिनी फायर टेंडर आत लहान अरुंद रस्त्यामध्ये जात असते.

 

शहराच्या वर्दळीच्या ठिकाणी, बाजारातील अरुंद रस्ते असलेल्या वस्त्यातील आगीच्या घटना नियंत्रणात आणण्यासाठी हे फायर टेंडर अग्निशमन विभागाच्या ताफ्यात दाखल झाले आहे. वेगाने होणारे शहरीकरण आणि वाढत्या उंच इमारती यांच्या सुरक्षेसाठी असलेल्या अग्निशमन विभागाला उभारी देण्याचा प्रयत्न मनपा प्रशासनाकडून केला जात आहे. अत्याधुनिक फायर टेंडरमुळे अग्निशमन विभाग सक्षम बनला आहे. वेगाने वाढणाऱ्या शहरात या नवीन फायर टेंडरमुळे आगीच्या घटना आटोक्यात आणण्याचा पूर्ण प्रयत्न करण्यात येणार आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button