महाराष्ट्र

अकरा वर्षे देशाच्या सर्वांगीण विकासाची पायाभरणी

केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी; प्रकट मुलाखतीत मांडला विकासकामांचा लेखाजोखा

 

नागपूर – पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्रातील एनडीए सरकारने अकरा वर्षांमध्ये पायाभूत सुविधा, आरोग्य, कृषी, शिक्षण आदी क्षेत्रांचा मोठ्या प्रमाणात विकास केला. खऱ्या अर्थाने या देशातील गरीब, कामगार, शेतकरी यांचे जीवन समृद्ध करण्यासाठी प्रत्येक पाऊल उचलले. गेल्या अकरा वर्षांमध्ये देशाच्या सर्वांगीण विकासाची पायाभरणी सरकारने केली आहे, या शब्दांत केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांनी विकासकामांचा लेखाजोखा मांडला.

भाजप महानगर शाखेच्या वतीने कवीवर्य सुरेश भट सभागृहात ना. श्री. नितीन गडकरी यांच्या प्रकट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले. ज्येष्ठ पत्रकार डॉ. उदय निरगुडकर यांनी एकाहून एक सरस प्रश्नांद्वारे मुलाखत रंगवली. भाजपचे शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनी प्रास्ताविक केले. तर आमदार संदीप जोशी यांनी डॉ. निरगुडकर यांचे स्वागत केले. विष्णू चांगदे यांनी सूत्रसंचालन केले.

गेल्या अकरा वर्षांत कोणत्या पाच क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात कामे झाली, हे सविस्तर सांगता येईल का? असा प्रश्न ना. श्री. गडकरी यांना विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, ‘१९४७ मध्ये देशाला स्वातंत्र्य मिळालं, त्यानंतर अनेक वर्षे काँग्रेसची सत्ता होती. पण काँग्रेसच्या धोरणांचे काय परिणाम झाले, हे अख्ख्या देशाने बघितले. दरम्यान, श्रद्धेय अटलजींच्या नेतृत्वातील सरकारने अनेक कामे केलीत. आणि २०१४ मध्ये सरकार आल्यानंतर एनडीएने अकरा वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात कामे केली.’

विमानतळांची संख्या दुप्पट झाली, रेल्वे, महामार्ग, टनेल्स, पर्यटन, पायाभूत सुविधा, आरोग्य, शिक्षण, सेवा प्रत्येक क्षेत्रात विकास झाला. २५ कोटी लोक गरिबीरेषेच्या वर आले. उज्ज्वला योजनेत ११ कोटी घरांमध्ये सिलींडर दिले. आयुष्यमान योजना, कृषी सिंचन योजना, उद्योग आदींच्या माध्यमातून भारताच्या विकासाला नवी दिशा मिळाली आणि भारत जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनला,’ असे ते म्हणाले. पुढील पाच वर्षांमध्ये वाहन उद्योगात आपला देश पहिल्या क्रमांकावर जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

 

विकासासाठी प्राथमिकता ठरविताना नागपूर, विदर्भ, महाराष्ट्र आणि देश याची प्राथमिकता कशी ठरवता, असा प्रश्न डॉ. निरगुडकर यांनी विचारला. त्यावर ना. श्री. गडकरी म्हणाले, ‘नागपूर ही माझी जन्मभूमी आणि कर्मभूमी आहे. येथील जनता माझा परिवार आहे. त्यामुळे नागपुरात मोठ्या प्रमाणात विकासकामे झालेली दिसतील. आतापर्यंत १ लाख कोटी रुपयांची कामे नागपूर शहरात झालीत. विदर्भात सिंचन आणि उद्योग या दोन क्षेत्रांच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. पण त्याचवेळी संपूर्ण देशाचाही मी विचार करतो. देशात कोणत्याही भागातील, कोणत्याही पक्षातील नेत्याला विचारा, ते समाधानीच आहेत. मी विकासकामे करताना राजकीय भेदभाव केला नाही,’

 

गडचिरोली आणि वाशीम या आकांक्षी जिल्ह्यांसाठी काय नियोजन केले? असेही त्यांना विचारण्यात आले. त्यावर ना. श्री. गडकरी म्हणाले, ‘गडचिरोलीमध्ये सात लाख कोटी रुपयांची गुंतवणुक झाली. पुढच्या पाच वर्षांत महाराष्ट्रातील सर्वांत प्रगत जिल्हा म्हणून गडचिरोलीची ओळख असेल, असा मला विश्वास आहे. वाशीममध्ये वैद्यकीय उपकरणांचे निर्मिती केंद्र होणार आहे. त्यासाठी वाशीम जिल्ह्यातील तीन तरुण विशाखापट्टणम येथून प्रशिक्षण घेऊन आले. हा प्रकल्प सुरू झाल्यावर वाशीम जिल्ह्यातील ३ हजार तरुणांना थेट रोजगार मिळणार आहे.’

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button