महाराष्ट्र

अमरावती शहरातील प्रधानमंत्री आवास योजनेच्या कामात त्रुटी

खासदार बळवंतराव वानखडे यांच्या पाहणीत गैरव्यवहाराचा संशय

अमरावती

येथे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सुरू असलेल्या गृहनिर्माण प्रकल्पाची आज अमरावतीचे सन्माननीय खासदार श्री. बळवंत वानखडे यांनी अनौपचारिक पाहणी केली. या पाहणीदरम्यान बांधकामाच्या गुणवत्तेत आणि अंमलबजावणीत अनेक गंभीर त्रुटी आढळून आल्याने गैरव्यवहाराचा संशय निर्माण झाला आहे.

या पाहणीवेळी खासदार बळवंत वानखडे यांच्यासोबत अमरावती शहरातील अनेक जागरूक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

खासदार वानखडे यांनी यावेळी बोलताना सांगितले की, “प्रधानमंत्री आवास योजना ही गरजू आणि गरीब कुटुंबांना परवडणारी घरे उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. मात्र, अमरावती येथील प्रकल्पातील कामाचा दर्जा अत्यंत सुमार असून, अनेक ठिकाणी नियमांचे उल्लंघन झाल्याचे स्पष्ट दिसत आहे. निकृष्ट दर्जाचे बांधकाम साहित्य वापरले जात असून, कामाची गती देखील असमाधानकारक आहे.”

उपस्थित लाभार्थींनीही आपल्या व्यथा मांडत, घरांच्या बांधकामात मोठ्या प्रमाणावर अनियमितता असल्याच्या तक्रारी केल्या. अनेक ठिकाणी घरांचे बांधकाम अर्धवट असल्याचे, तर काही ठिकाणी ठरलेल्या मानकांनुसार काम झाले नसल्याचे निदर्शनास आणून दिले.

या गंभीर प्रकाराची तातडीने दखल घेऊन, संबंधित विभागाकडून सखोल चौकशी करण्याची मागणी खासदार बळवंत वानखडे यांनी केली आहे. दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली. या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन, या प्रकरणात पारदर्शकता आणण्यासाठी आणि गरजू लाभार्थींना लवकरात लवकर दर्जेदार घरे मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे खासदार बळवंत वानखडे यांनी सांगितले.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button