बाबा धाम दर्शनासाठी रेल्वेची खास भेट – गोंदिया ते मधुपुर ‘श्रावणी स्पेशल’ ट्रेन ८ फेऱ्यांसाठी धावणार

गोंदिया –श्रावण महिना सुरू होताच बाबा धाम जाणाऱ्या भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढते. या पार्श्वभूमीवर दक्षिण पूर्व मध्य रेल्वेने भाविकांसाठी एक सुखद बातमी दिली आहे. गोंदिया-मधुपुर-गोंदिया मार्गावर ‘श्रावणी स्पेशल ट्रेन’ चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
ही ट्रेन ११ जुलै २०२५ ते ०८ ऑगस्ट २०२५ दरम्यान एकूण ८ फेऱ्या करणार आहे. गाडी क्रमांक 08855 आणि 08856 ही विशेष सेवा प्रत्येक शुक्रवार व सोमवार गोंदियाहून मधुपुरकडे आणि प्रत्येक शनिवार व मंगळवार मधुपुरहून गोंदियाकडे धावेल.
या ट्रेनमध्ये प्रवाशांसाठी एकूण १८ डब्यांची व्यवस्था करण्यात आली आहे, ज्यामध्ये
२ एसएलआरडी
६ जनरल
७ स्लीपर
१ एसी-3 टियर
२ एसी चेअर कारचा समावेश आहे.
ट्रेनचे ठराविक ठिकाणी थांबेही निश्चित करण्यात आले असून त्यामध्ये डोंगरगड, दुर्ग, रायपूर, बिलासपूर, रायगड, राऊरकेला, टाटानगर, बर्द्धमान, आसनसोल यांसह अनेक महत्त्वाचे स्थानके समाविष्ट आहेत.
08855 गोंदिया–मधुपुर स्पेशल ट्रेन गोंदियाहून दुपारी १२.३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी १२.३० वाजता मधुपुरला पोहोचेल.
तसेच 08856 मधुपुर–गोंदिया स्पेशल ट्रेन, मधुपुरहून दुपारी २.३० वाजता रवाना होऊन दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ५ वाजता गोंदियात पोहोचेल.
श्रावण महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ही विशेष ट्रेन सेवा भाविकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार असून, रेल्वे प्रशासनाकडून हा एक स्वागतार्ह निर्णय मानला जात आहे.