चांपा-हळदगाव-खापरी रस्त्याच्या दुरवस्थेविरोधात ग्रामस्थांचे रास्ता रोको
पालकमंत्र्यांचे त्वरित दुरुस्तीचे निर्देश

जिल्ह्यातील उमरेड तालुक्यातील चांपा, हळदगाव, परसोडी आणि खापरी या गावांना जोडणाऱ्या रस्त्याच्या दयनीय अवस्थेमुळे स्थानिक ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन केले. या रस्त्यावर दररोज 700 ते 800 ओवरलोडेड ट्रकांची वाहतूक होत असल्याने जड वाहतुकीमुळे उडणारी विषारी धूळ आणि पावसाळ्यात खड्ड्यांमुळे “खड्यात रस्ता की रस्त्यात खड्डे” अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे अपघात वाढले असून, शाळकरी विद्यार्थी, वयोवृद्ध आणि आजारी महिलांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या मार्गावर बस सेवा बंद झाल्याने ग्रामस्थांचे हाल वाढले आहेत.
चांपा परिसरातील क्रेशर प्लांटमुळे टोल टाळण्यासाठी शेकडो वाहने या मार्गाचा वापर करतात. यामुळे शासनाच्या प्रति दिवस पाच लक्ष रुपये इतका महसूल बुडत असल्याची धक्कादायक गंभीर बाब समोर आली आहे.या भागातून सुमारे दीडशे कोटींचा महसूल सरकार जमा होत असल्याने, याच निधीतून 40 टन क्षमतेच्या सिमेंट कॉंक्रिट रस्त्याच्या निर्मितीची मागणी ग्रामस्थांनी केली. आंदोलनात भाजप जिल्हाध्यक्ष आनंदराव राऊत, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष गोविंदराव ढगे, हळदगावचे सरपंच गोविंदा हाते, चांपाचे माजी सरपंच अतिश पवार, युवा कार्यकर्ते लक्ष्मीकांत धोपटे, शशिकांत मेश्राम,रुपेश हजारे,सुमित जैस्वाल, प्रतिम बन,यांच्यासह अनेकांनी सहभाग घेतला.
आंदोलनस्थळी उपविभागीय अधिकारी विद्यासागर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली उपस्थित तहसीलदार मनोहर चव्हाण यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना निवेदन सादर करण्यात आले.भाजप जिल्हाध्यक्ष राऊत यांनी नागपूर जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून तात्काळ निधी उपलब्ध करून रस्त्याची दुरुस्ती करण्याचे आश्वासन दिले.नंतर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले, मात्र रस्त्याची मंजुरी मिळेपर्यंत आंदोलने सुरू ठेवण्याचा इशारा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष गोविंदराव ढगे व परिसरातील सर्व सरपंचानी दिला.
ग्रामस्थांच्या आंदोलनामुळे प्रशासनाने तात्काळ पावले उचलली आहे. राज्याचे महसूल मंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रशासनाची तात्काळ बैठक घेऊन चांपा-खापरी रस्त्याच्या त्वरित निर्मितीचे निर्देश दिले. चांपा डव्हा खापरी रस्ता 80 कोटी रुपये खर्चून सिमेंट कॉंक्रिट रस्ता बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. जुलैच्या पावसाळी अधिवेशनात यासाठी बजेट मंजूर करून दिवाळीपर्यंत काम सुरू होईल, असे आश्वासन पालकमंत्र्यांनी दिले.या आंदोलनामुळे प्रशासनाचे रस्त्याच्या समस्येकडे लक्ष वेधले गेले असून, लवकरच सिमेंट कॉंक्रिट रस्त्याच्या निर्मितीमुळे चांपा परिसरातील स्थानिक ग्रामस्थांना दिलासा मिळण्याची आशा आहे.