दुचाकीवरून सुटले नियंत्रण, भीषण अपघात,कालव्यात पडून एकाचा मृत्यू तर एक गंभीर जखमी.
रामटेक हद्दीत काचुरवाही हातोडी मार्गावर

रामटेक पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या काचूरवाही हातोडी जवळील अन्नपूर्णा राईस मिल परिसरात असणाऱ्या वळणावर दुचाकी अनियंत्रित होऊन कालव्यात पडून झालेल्या अपघातात एका मुलाचा मृत्यू तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना दिनांक २३ जून रोजी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास घडल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
प्राप्त माहितीनुसार, रामटेक पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या काचुरवाही हातोडी मार्गावर वळणावरून दुचाकी अनियंत्रित झाल्याने थेट मोठ्या कालव्यात पडल्याने दुचाकी चालक मृत्यू तर मागे बसलेला एक मुलगा गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. यात प्रामुख्याने मृतकात चालक हिमांशू पप्पू बेलेकर (वय 18 वर्ष) व आर्यन सुधाकर मेश्राम वय 18 वर्ष (जखमी) दोघेही रा. धनी ता. मौदा. या दोघांचा समावेश आहे. दोघेही रामटेक वरून काचुरवाही मार्गाने आपल्या मूळ गावी धनी येथे जात असताना हातोडी परिसरात येताच वळणावर वाहनावरून नियंत्रण सुटल्याने त्यांचे दुचाकी क्रमांक एम एच ४० एस ०२२४ ही थेट मोठ्या कालव्यात कोसळली. यात चालकाला आणि मागे बसलेल्या मुलाला गंभीर दुखापत झाली.
अपघात होताच गावातील नागरिकांनी दोन्ही जखमींना तात्काळ बाहेर काढून रामटेक उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यांची परिस्थिती गंभीर पाहता उपजिल्हा रुग्णालयातून त्यांना थेट नागपूर येथे रेफर करण्यात आले. मात्र पहाटे सकाळी ७ वाजताच्या दरम्यान हिमांशू याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर आर्यन जखमी असून त्याच्यावर उपचार सुरु आहे.
वळणावर ब्रेकर आणि सूचनाफलक लावण्याची मागणी.
रामटेक काचूरवाही मार्गांवर हातोडी परिसरात येताच मोठी वळण असल्याने अनेकांना रस्त्याचा अंदाज समजत नसल्याने अशा प्रकारचे अपघात घडत असतात. होणारे अपघात थांबविण्यासाठी या वळण मार्गांवर दोन्ही बाजूला ब्रेकर तयार करून दोन्ही बाजूस धोकादायक वळणमार्ग असल्याचे सूचनाफलक लावावे जेणेकरून प्रवाशांना सूचना मिळेल अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.