
नागपूर / वार्ताहर – क्षितिजा देशमुख
हायकोर्ट बार असोसिएशन (HCBA) नागपूरच्या वतीने भारताचे विद्यमान सरन्यायाधीश मा. श्री. भूषण गवई यांचा भव्य सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. हा सोहळा २८ जून २०२५ रोजी दुपारी ५ वाजता, नागपूरच्या सुरेश भट सभागृहात पार पडणार आहे.
गवई सरन्यायाधीश हे नागपूरच्या न्याय क्षेत्रातील प्रथम व्यक्ती आहेत, जे देशाच्या सर्वोच्च न्यायासनावर विराजमान झाले आहेत. त्यांच्या या ऐतिहासिक निवडीमुळे संपूर्ण नागपूरकर वकीलवर्ग आणि शहरवासीयांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
या सत्कार सोहळ्यासाठी विधीक्षेत्रातील अनेक मान्यवर, निवृत्त न्यायमूर्ती, वरिष्ठ वकील, तसेच विविध जिल्ह्यांतील बार असोसिएशन्सचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. सोहळ्याचे आयोजन भव्य स्वरूपात करण्यात आले असून, गवई यांचा जीवनप्रवास, न्यायिक कार्य, आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर प्रकाश टाकणारा विशेष कार्यक्रमही सादर केला जाणार आहे.
HCBA चे अध्यक्ष अॅड.अतुल पांडे यांनी सांगितले की, “गवई सरन्यायाधीश हे आमच्या शहरासाठी प्रेरणास्त्रोत आहेत. त्यांचा सन्मान करणं हे आमचं कर्तव्य आहे. नागपूरचा हा ऐतिहासिक क्षण सर्वांनी अनुभवावा, यासाठी सर्व नागरिकांना उपस्थित राहण्याचं आवाहन करत आहोत.”