महाराष्ट्र ग्रामीण

खापरी (रेल्वे) गावठाणातील सर्व प्रकल्पग्रस्तांना न्याय दिला

महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे*

नागपूर

समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहचविण्यासाठी राज्यशासन कटीबद्ध असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात लोकाभिमुख, गतिशील व पारदर्शीपणे कार्य सुरू आहे. घरकुलापासून कोणीही वंचित राहू नये, अशी शासनाची भूमिका असल्याचे सांगून मिहान प्रकल्पग्रस्त खापरीसह चार गावांतील शेवटच्या लाभार्थ्यापर्यंत पुनर्वसनाचा लाभ पोहोचवल्याचे आज महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. त्यांच्या हस्ते मिहान प्रकल्पांतर्गत मौजा-खापरी (रेल्वे) गावठाणातील प्रकल्पग्रस्तांना प्रातिनिधिक पट्टे वाटप करण्यात आले.

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान तथा 100 दिवसांच्या कृती कार्यक्रमांतर्गत जिल्हाधिकारी कार्यालय आणि महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने मिहान येथील पुनर्वसीत अभिन्यासातील जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात आयोजित मौजा खापरी (रेल्वे) येथील पात्र 500 प्रकल्पग्रस्तांना महसूलमंत्री श्री. बावनकुळे यांच्या उपस्थितीत पट्टे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी, नागपूर (ग्रामीण) च्या उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते, माजी जिल्हा परिषद सदस्य रुपराव शिंगणे, खापरीचे माजी सरपंच केशवराव सोनटक्के आदी यावेळी उपस्थित होते.

महसूलमंत्री श्री. बावनकुळे म्हणाले, गेल्या 15 वर्षांपासून प्रतिक्षेत असलेल्या मिहान प्रकल्पग्रस्तांचे राज्यशासनाने पुनर्वसन करुन त्यांना न्याय मिळवून दिला आहे. या भागातील कलकुही, दहेगाव, तेल्हारा या गावांचे पुनर्वसन झाले. मात्र, खापरी गाव पुनर्वसनापासून वंचित होते. 2015 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खापरी गावाच्या पुनर्वसनाचा विषय प्राधान्याने मार्गी लावण्याचा निर्णय घेतला. जिल्हा प्रशासनाने आवश्यक सर्व शासकीय बाबी पूर्ण करुन खापरी गावातील 765 लाभार्थ्यांना पट्टे वाटपाचा मार्ग मोकळा केला. ज्या पात्र लाभार्थ्यांना पुनर्वसनाचा लाभ मिळाला नाही त्यांनी नव्याने अर्ज करावा आणि लाभ प्राप्त झालेल्या व्यक्तींनी पुन्हा अर्ज करु नये, असे आवाहनही त्यांनी केले.

*जनतेशी संवादाचा नागपूर पॅर्टन राज्यव्यापी व्हावा*

नागपूर (ग्रामीण) उपविभागीय कार्यालयामार्फत परिक्षेत्रातील गावांमध्ये जनतेचे प्रश्न जनतेच्या गावात या संकल्पनेवर आठवड्यातील दोन दिवस जनतेशी संवादाचा कार्यक्रम राबवून जनतेचे प्रश्न गावातच सोडविण्याचा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात अन्यत्रही हा उपक्रम प्रभावीपणे राबविला जावा आणि जनतेचे प्रश्न सोडविण्याच्या नागपूर पॅर्टनचा विस्तार होऊन तो राज्यात राबविला जावा, अशा अपेक्षा महसूलमंत्री श्री.बावनकुळे यांनी व्यक्त केल्या.

*सहा लाभार्थ्यांना प्रातिनिधिक पट्टे वाटप*

श्री. बावनकुळे यांच्या हस्ते अशोक सोनटक्के, विनायक बारई, विजय बारई, भूषण जुनघरे, प्रमोद लक्षणे आणि रामदास सोनुले यांना प्रातिनिधिकरित्या पट्टे वितरीत करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते यांनी प्रास्ताविक केले.

जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मौजा-खापरी (रेल्वे) गावठाणातील एकूण 765 पात्र प्रकल्पग्रस्तांना खापरी (रेल्वे) येथील गावठाणाच्या भूखंडावर संपूर्ण उच्च दर्जाच्या नागरी सुविधेसह सुमारे 28 हेक्टर क्षेत्रात पुनर्वसीत करण्यात आले आहे. यातील 500 लाभार्थ्यांना आज पट्टे वाटप करण्यात आले. उर्वरित 265 लाभार्थ्यांना लवकरच पट्टे वाटप करण्यात येणार आहे.

या पुनर्वसीत अभिन्यासात जवळपास 38 कोटी रुपये खर्चातून नागरी सुविधा तयार करण्यात आल्या. या अभिन्यासात डांबरीकरण केलेले अंतर्गत रस्ते, उघडी-बंद गटारे, नाला, पाण्याचा -निचरा होण्यासाठी नाली, नळ पाणीपुरवठा करण्यासाठी पाईप लाईन, मलः निस्सारण वाहिनी व विद्युत पुरवठ्यासाठी 11 के.व्ही व 33 के.व्ही. च्या विद्युत वाहिनीचा समावेश आहे. मिहान प्रकल्पांतर्गत, मौजा-खापरी (रेल्वे) गावठाणातील घरे संपादीत करण्यात आलेली असून येथील प्रकल्पग्रस्तांना त्यांच्या संपादीत घराचा मोबदला जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत वाटप करण्यात आलेला आहे.

00000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button