कमलेश चौधरीने शासकीय जमीन बळकावण्यासाठी तयार केले बनावट कागदपत्र:गुन्हा दाखल
कमलेश चौधरीविरोधात MCOCA लागू करा:ज्वाला धोटे यांची मागणी

नागपूर – फूटाळा तलाव व त्याच्या कॅचमेंट क्षेत्रावर बेकायदेशीर अतिक्रमणासाठी प्रसिद्ध असलेला कमलेश दिलीप चौधरी याने आता सिटी सर्व्हे कार्यालय क्र. ३, भूमी अभिलेख विभागाचा बनावट दस्तऐवज तयार करून मौजा तेलंगखेडी येथील तब्बल ४३.८७ लाख चौ.फुट शासकीय जमीन बळकावण्याचा गंभीर प्रयत्न केला आहे. या प्रकरणी सदर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई सिटी सर्व्हे कार्यालय क्र. ३ यांच्या तक्रारीवरून करण्यात आली आहे. २० जून २०२५ रोजी सदर पोलीस ठाण्यात कमलेश चौधरी विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला. याआधी २९ मे २०२५ रोजी, अन्याय निवारण मंचच्या अध्यक्षा ज्वाला जांबुवंतराव धोटे यांनी कमलेश, त्याची आई मीना आणि भाऊ मुकेश यांनी सादर केलेल्या बनावट दस्तऐवजांविरोधात सिटी सर्व्हे कार्यालयात लेखी तक्रार केली होती. त्यानंतर कार्यालयाने १७ जून २०२५ रोजी अधिकृत पोलीस तक्रार दाखल केली.
आमदार विकास ठाकरे यांनी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे भूमी अभिलेख विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांना एफआयआर नोंदवण्याचे निर्देश देण्यासाठी निवेदन सादर केले.
एफआयआरनुसार, ४०,७७,३९.१ चौ.मी. (४३,८७,२७२.७१६ चौ.फुट) क्षेत्रफळाची जमीन सिटी सर्वे नंबर ६५, मौजा तेलंगखेडीमध्ये असून ती महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या मालकीची आहे. सिटी सर्व्हे कार्यालयाच्या ऑनलाइन व ऑफलाइन नोंदींनुसार, या जमिनीत महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ (माफसू), डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ (PDKV) आणि ICMR/नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर वन हेल्थ यांचे हक्क नोंदवलेले आहेत.
२१ जानेवारी २०२५ रोजी, कमलेश चौधरीने सिटी सर्व्हे कार्यालयात अखिव पत्रिकेची प्रत जोडून अर्ज सादर केला होता. या प्रतामध्ये हस्तलिखित स्वरूपात दिलीप दयाराम चौधरी हे या जमिनीचे पट्टेदार असल्याचे भासवले होते आणि ऑनलाइन नोंदींमध्ये हे नाव समाविष्ट करण्याची मागणी केली होती. मात्र, कार्यालयाने तपासणीअंती ही प्रत बनावट असल्याचे स्पष्ट केले आणि अर्ज फेटाळून लावला. त्यावेळी गुन्हा नोंदवला गेला नव्हता. ज्वाला जांबुवंतराव धोटे यांच्या पत्रानंतरच पोलिसांत तक्रार करण्यात आली.
या नव्या गुन्ह्यासह, कमलेश चौधरीविरोधात आतापर्यंत चार गुन्हे नोंदवले गेले आहेत — त्यातील तीन फूटाळा तलाव आणि कॅचमेंट क्षेत्रातील बेकायदेशीर अतिक्रमण व बांधकामासाठी, आणि चौथा बनावट दस्तऐवज तयार केल्याबद्दल आहे.
ज्वाला जांबुवंतराव धोटे यांनी प्रसिद्धीपत्रकात मागणी केली की, कमलेश चौधरीविरोधात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (MCOCA) अंतर्गत कारवाई करण्यात यावी. “कमलेश चौधरी हा केवळ शासकीय जमीन बळकावत नाही, तर बनावट शासकीय दस्तऐवज तयार करत आहे. हेच बनावट दस्तऐवज तो नागपूर महानगरपालिका, नगर विकास विभाग, तसेच नागपूर सिव्हिल कोर्ट, जिल्हा न्यायालय व उच्च न्यायालयात सादर करून शासकीय व न्याय यंत्रणेला दिशाभूल करत आहे. त्यामुळे त्याला अटक करून संपूर्ण चौकशी होईपर्यंत कोठडीत ठेवावे व MCOCA अंतर्गत कठोर कारवाई करावी,” अशी मागणी त्यांनी केली.