महाराष्ट्र

मॉडेल मिल कामगार वसाहतीतील ३२० कुटुंबांना मिळणार हक्काचं घर

रहिवाश्यांनी मानले केंद्रीय मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांचे आभार

नागपूर – गेली कित्येक वर्षे रखडलेला मॉडेल मिल वसाहतीच्या पुनर्वसनाचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांनी वेळोवेळी केलेले प्रयत्न आणि पाठपुराव्यामुळे ३२० कुटुंबांना हक्काचं घर मिळणार आहे. वसाहतीतील रहिवाश्यांनी ना. श्री. गडकरी यांची भेट घेऊन त्यांचे आभार मानले आहेत.

गणेशपेठ भागातील मॉडेल मील वसाहत फार जुनी आहे. कित्येक दशकांपासून येथील कुटुंबांचे पिढ्यान् पिढ्या वास्तव्य करीत आहेत. विशेष म्हणजे ही विदर्भातील एकमेव कामगार वसाहत आहे. परंतु, वसाहतीचे पुनर्वसन होऊन येथील कुटुंबांना हक्काचं घर मिळावं, यासाठी अनेक वर्षे संघर्ष सुरू होता. ना. श्री. नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथील कुटुंबांना हक्काचं घर मिळावं म्हणून प्रयत्न सुरू केले. माजी महापौर अर्चना डेहनकर यांनी त्यासाठी विशेष पाठपुरावा केला. त्यात काही अंशी यशही आले होते. पण, २००७ ते २०१२ या कालावधीत राज्य सरकारने एफएसआय कमी केला.

एफएसआय वाढवून देण्याची मागणी देखील लावून धरली. दरम्यान, महानगरपालिकेने अहवाल पाठविल्यानंतर २०२२ ते २०२४ या कालावधीत सरकारने विशेष अधिसूचना काढली. यामध्ये ३.१६ एकरपैकी जवळपास एक एकर जागेत ३२० कुटुंबांसाठी घरे बांधण्याचा निर्णय झाला. एफएसआयदेखील वाढविण्यात आला. अलीकडेच बांधकाम कंत्राटदाराला नकाशा मंजुरीचे पत्र मिळाले असून मॉडेल मील कामगार वसाहतीतील नागरिकांना हक्काचे घर मिळण्याचा प्रश्न पूर्णपणे मार्गी लागला आहे.

कामगारांच्या प्रतिनिधींनी घेतली ना. श्री. गडकरी यांची भेट

वसाहतीतील नागरिकांनी ना. श्री. गडकरी यांची भेट घेऊन आभार मानले. यावेळी भाजपचे शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी यांचीही उपस्थिती होती. माजी महापौर अर्चना डेहनकर यांनी वीस वर्षे सातत्याने यासंदर्भात प्रयत्न केल्याबद्दल कामगारांच्या प्रतिनिधींनी त्यांचेही विशेष आभार मानले. ‘२२ महिन्यांमध्ये घरे बांधून देईल, असे कंत्राटदाराकडून लिहून घ्यावे. तसा करार कंत्राटदारासोबत करून घ्यावा,’ अशी सूचना ना. श्री. गडकरी यांनी कामगारांच्या प्रतिनिधींना केली. यावेळी पृथ्वीराज शंभरकर, मोहन बानाईत, दीपक बानाईत, श्री. मानकर, श्री. केशव श्रोते आदींची उपस्थिती होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button