महाराष्ट्रमहाराष्ट्र ग्रामीण

मेट्रोत वस्तू हरवली? काळजी नको! माझी मेट्रोवर विश्वास ठेवा !

नागपूर मेट्रोने या वर्षी ४५०+ वस्तू सुरक्षितपणे परत केल्या

 

नागपूर: धावपळीच्या जीवनशैलीत प्रवास करताना एखादी वस्तू हरवणे ही सामान्य गोष्ट आहे. मात्र मेट्रोसारख्या सुरक्षित आणि जबाबदार सार्वजनिक परिवहन व्यवस्थेमुळे ही काळजी आता भूतकाळात जमा होऊ लागली आहे. महा मेट्रो नागपूरने या विश्वासास पात्र ठरवत यंदा तब्बल ४५० पेक्षा अधिक हरवलेल्या वस्तू त्यांच्या मूळ मालकांपर्यंत सुरक्षितपणे परत पोहोचवल्या आहेत. प्रवाशांनी मेट्रोमध्ये विसरलेल्या किंवा हरवलेल्या वस्तू मेट्रो कर्मचाऱ्यांना किंवा सोशल मिडिया चॅनेल्सद्वारे कळवल्यानंतर, मेट्रो प्रशासनाने तत्परतेने त्या वस्तू शोधून काढल्या व ‘लॉस्ट अँड फाउंड’ विभागाच्या मदतीने परत केल्या. त्यामुळे मेट्रो प्रवास हा केवळ सोयीचा नव्हे, तर विश्वासाचा प्रवास ठरत आहे.

 

मेट्रोमध्ये प्रवास करणाऱ्या अनेक प्रवाशांच्या वस्तू ट्रेनमध्ये किंवा मेट्रो परिसरात विसरल्या गेल्याच्या घटना वेळोवेळी समोर येत असतात. अशा हरवलेल्या आणि नंतर परत करण्यात आलेल्या वस्तूंमध्ये लॅपटॉप, मोबाईल, पाकिटे, घड्याळे, पिशव्या ते चक्क हजारो रुपयांची रक्कम अशा अनेक मौल्यवान वस्तूंचा समावेश आहे. प्रवाशांच्या विसरलेल्या वस्तू त्यांच्या मूळ मालकांपर्यंत पोहोचवण्यासाठी महा मेट्रो नागपूरने ‘लॉस्ट अॅाण्ड फाउंड सेल’ची स्थापना केली आहे. मेट्रोचे कर्मचारी सतत सतर्क राहून अशा वस्तू संकलित करून त्या या सेलमध्ये जमा करतात, जेणेकरून योग्य ओळख पटवून त्या परत दिल्या जाऊ शकतील. महा मेट्रोच्या कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणाचा आदर्श ठेवत याआधीही अनेक महागड्या व मौल्यवान वस्तू परत करत प्रवाशांचा विश्वास संपादन केला आहे. एकदा तर नागपूर मेट्रोच्या सोशल मीडियावर आलेल्या एका मॅसेजवरून त्वरित ऍक्टिव होऊन मेट्रो कर्मचाऱ्यांनी बॅग त्याच्या मालकाला परत मिळवून दिली.

 

नुकत्याच घडलेल्या दोन घटनांनी महा मेट्रोच्या दक्षतेचा आणि प्रामाणिकतेचा प्रत्यय आणखी एकदा दिला. कॉटन मार्केट मेट्रो स्थानकावर एक प्रवासी तिकीट खरेदी करताना आपली बॅग तिकीट काउंटरवर विसरून गेले होते. विशेष म्हणजे या बॅगेत तब्बल ३.५ लाख रुपये होते. सुरक्षा रक्षक श्री. रोहन यांच्या तत्परतेमुळे ही बॅग तात्काळ ताब्यात घेऊन नियमानुसार स्टेशन कंट्रोल रूममध्ये जमा करण्यात आली. अशाचप्रकारे एका महिला प्रवाशांची, अंदाजे १ लाख रुपये किमतीच्या सोन्याच्या दागिन्यांसह थोडी रोकड असलेली बॅगही मेट्रोमध्ये विसरली गेली होती. ही बॅगही संबंधित स्थानकावर सुरक्षित जमा करण्यात आली आणि योग्य पडताळणीनंतर त्या प्रवाशांना परत करण्यात आली. या दोन्ही प्रवाशांनी महा मेट्रोच्या कर्मचार्यां्चे मनापासून आभार मानत त्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक केले.

 

या वर्षात आतापर्यंत सुमारे ४५० पेक्षा अधिक हरवलेल्या वस्तू महा मेट्रो नागपूरने त्यांच्या मूळ मालकांपर्यंत परत केल्या आहेत, हे या सेवाभावाचे जिवंत उदाहरण आहे. महा मेट्रो सर्व सन्माननीय प्रवाशांना आपल्या वस्तूंची काळजी घेण्याचे आवाहन करते आणि पर्यावरणपूरक, सुरक्षित व विश्वासार्ह वाहतुकीचा पर्याय निवडल्याबद्दल मनःपूर्वक आभार मानते. आपल्या जबाबदार आणि प्रामाणिक कर्मचाऱ्यांचा आम्हाला अभिमान असून, भविष्यातही अशीच सेवा, सुरक्षा आणि विश्वास टिकवण्यासाठी महा मेट्रो कटिबद्ध आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button