नवीन शैक्षणिक धोरणात रोजगाराभिमूख कौशल्य विकासाला प्राधान्य
केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी; ‘मंथन’च्या वतीने शिक्षक परिसंवादाचे आयोजन

नागपूर – सर्वप्रकारच्या सोयीसुविधा उपलब्ध झाल्या तरीही प्रशिक्षित मनुष्यबळ ही काळाची गरज असणार आहे. हे मनुष्यबळ शैक्षणिक धोरणांमधील बदलांच्या माध्यमातून उपलब्ध होऊ शकते. त्यामुळे नवीन शैक्षणिक धोरणात व्यवसायाभिमूख तांत्रिक शिक्षण, रोजगाराभिमूख कौशल्य विकास यांना विशेष प्राधान्य देण्यात आले आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांनी आज (शुक्रवार, दि. २७ जून) येथे केले.
मंथनच्या वतीने रेशीमबाग येथील कवीवर्य सुरेश भट सभागृहात शिक्षक परिसंवाद आयोजित करण्यात आला. त्यावेळी ना. श्री. गडकरी बोलत होते. या कार्यक्रमाला भाजपचे नागपूर शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी, आमदार प्रवीण दटके, भाजपचे ज्येष्ठ नेते संजय भेंडे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्र-कुलगुरू सुभाष कोंडावार, डॉ. शैलेंद्र देवरणकर, डॉ. श्रीपाद ढेकणे, माजी आमदार नागो गाणार, मोहित शाह, विष्णू चांगदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
ना. श्री. गडकरी म्हणाले, ‘२०२० मध्ये आपण शैक्षणिक धोरण स्वीकारले. त्या धोरणाचे उद्दिष्ट्य समजून घेण्याची गरज आहे. आपल्या देशात अनेक क्षेत्रात अनेक लोक उत्तम काम करतात. परंतु, भविष्यातील माणूस घडविण्यासाठी जे आवश्यक आहे, त्यानुसार उद्दिष्ट्य निश्चित करण्याची गरज आहे. जगात समाजिक, आर्थिक, शैक्षणिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात परिवर्तन होत आहे. आपल्याला विश्वगुरू व्हायचे आहे, जगातील तिसरी अर्थव्यवस्था व्हायचे आहे आणि आत्मनिर्भर भारत निर्माण करायचा आहे, असे स्वप्न पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी बघितले आहे.’
विश्वगुरू म्हणून मान्यता प्राप्त करायची असेल तर फक्त आर्थिक आधारावर ते शक्य नाही. त्यासाठी आपली संस्कृती, परंपरा, मूल्याधिष्ठित जीवन पद्धती याचा देखील विचार करावा लागेल. त्याचेही वेगळेपण समजून घ्यावे लागेल. भविष्यातील पिढी तयार करण्यासाठी ते अधिक महत्त्वाचे आहे, याचाही त्यांनी आवर्जून उल्लेख केला.