रस्ता समतलीकरणाचे कामे पूर्ण न केल्याने कंत्राटदारांवर १ कोटींचा दंड
मनपातर्फे वारंवार सूचना देऊनही कंत्राटदारांनी कामे पूर्ण केली नाही

नागपूर, केंद्र सरकारच्या अमृत २.0 योजनेअंतर्गत मलनिःसारण वाहिनी बांधण्याचे कंत्राट तीन कंत्राटदारांना दिले होते. परंतु या तिन्ही कंपन्यांनी वारंवार सूचना देऊन रस्ता समतलीकरणाचे काम पूर्ण न केल्याने मेसर्स लक्ष्मी सिव्हील इंजिनिअरिंग सर्विसेस प्रा. लिमिटेड, मे. कलथिया इंजीनिअरिंग अँड कंस्ट्रक्शन लिमीटेड व मे. पी. दास इंफ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमीटेड या तिन्ही कंपन्यांवर १ कोटी रुपयांचा दंड महापालिकने ठोठावला आहे. या कंत्राटदारांनी सीवर लाईन टाकण्यासाठी रस्ते खोदले होते. परंतु, रस्त्याचे समतलीकरण वेळेवर केले नाही.
अमृत योजना २.0 अंतर्गत शहरात ५३७ किलोमीटर लांबीची मलनिःसारण वाहिनी टाकण्याचे कंत्राट या तिन्ही कंपन्यांना दिले आहे. यापैकी १२५ किलोमीटर लांबीची मलनिःसारण वाहिनी टाकण्याचे काम या कंत्राटदारांनी केले. गेल्या फेब्रुवारी महिन्यापासून महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत वारंवार ही रस्ता पूर्ववत करण्याची कामे करण्यासाठी पाठपुरावा केला जात आहे. हे काम गांभीर्याने घेऊन पूर्ण करावे, यासंदर्भात महापालिकेतर्फे अनेकदा लेखी पत्रे या कंपन्यांना दिलेले आहे. यासंदर्भात महापालिका आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी स्वतः या संदर्भात दंड ठोठावण्याचा इशारा गेल्या २७ मे रोजी झालेल्या बैठकीत दिला होता. परंतु त्यानंतरही या कंपन्यांनी काम पूर्ण न केल्याने या कंपन्यांवर २५ लाख रुपये प्रतिनिविदा प्रमाणे १ कोटी रुपयांचा दंड ठोठावला असल्याची माहिती अधीक्षक अभियंता डॉ. श्वेता बॅनर्जी यांनी दिली.