शहरातील २२७ नाल्याची स्वच्छता पूर्ण
अतिरिक्त आयुक्त श्रीमती वसुमना पंत यांनी केली नालेसफाई कार्याची पाहणी

नागपूर –पावसाळ्यात शहरातील सखल भागांमध्ये पाणी साचू नये, यासाठी नागपूर महानगरपालिका प्रशासनाने कंबर कसली आहे. याच अनुषंगाने मंगळवारी(ता.२४) मनपाच्या अतिरिक्त आयुक्त (शहर) श्रीमती वसुमना पंत यांनी धरमपेठ झोनमधील विकासनगर नाला आणि लक्ष्मीनगर झोनमधील नालेसफाईच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली.
या पाहणी दौऱ्यादरम्यान अतिरिक्त आयुक्त श्रीमती वसुमना पंत यांनी संबंधित अधिकाऱ्यांना पावसाळ्यात वस्त्यांमध्ये पाणी साचू नये यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. विशेषतः मागील वर्षी ज्या परिसरांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते, त्या ठिकाणांची श्रीमती पंत यांनी स्वतः पाहणी केली. तेथील पाण्याचा निचरा होण्यास अडथळा निर्माण करणाऱ्या बाबी त्वरित दूर करण्याचे निर्देश श्रीमती पंत यांनी दिले.
नागपूर शहरात एकूण २२७ नाले असून, त्यांची स्वच्छता पूर्ण करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली. नालेसफाईच्या कामाची गुणवत्ता आणि कार्यक्षमता सुनिश्चित करण्यावर प्रशासनाचा भर असल्याचे यातून दिसून आहे. या पाहणी दौऱ्याप्रसंगी घनकचरा व्यवस्थापन उपायुक्त श्री. राजेश भगत, मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले, झोनल अधिकारी श्री. टेंभेकर यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.