महाराष्ट्र

सत्रापुरात पुन्हा वाघाने केले गायीला ठार

वाघाचा धुमाकूळ सुरूच, वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी.

रामटेक – सद्या रामटेक वनपरीक्षेत्र हद्दीत येणारा सत्रापूर गाव दिवसेंदिवस होणाऱ्या वाघाच्या हल्ल्याने पूर्णपणे हादरला असून गरीब शेतकरी वर्ग शेती करावयास भीतीपोटी घाबरून गेला आहे. वनविभागाने वाघाला पकडून परिसराबाहेर नेऊन गावकऱ्यांना भयमुक्त करण्याची मागणी भयभीत गावकरी करीत आहेत.

गेल्या १५ दिवसापासून सत्रापूर,बोन्द्री,सराखा या शिवारात वाघाचा वावर असून अनेक शेतकऱ्यांच्या शेतात असणाऱ्या जनावरांना वाघाने हल्ला करून ठार केले आहे.

 

दि.२३ मे रोजी उदाराम आपतूरकर रा.सत्रापूर यांच्या शेतातील २ बकऱ्यांवर हल्ला करून वाघाने ठार केले.

दि.२९ मे रोजी भीमराव ठाकूर रा.सत्रापूर यांच्या गावालगत बांधलेल्या गोठ्यात एका गोऱ्यावर वाघाने हल्ला करून जखमी केले होते. काही दिवस उपचार करून दि.८ जून रोजी त्या गोऱ्याचा देखील मृत्यू झाला.

दि.७ जून रोजी देवमन उईके रा.सत्रापूर यांच्या दुधाच्या गायीवर दिवसा-ढवळ्या वाघाने हल्ला करून जागीच ठार केले.

दि. १० जून रोजी घनश्याम उईके यांच्या गोऱ्यावर वाघाने हल्ला करून जखमी केले होते. मात्र उपचार घेत असतांनाच दि.१३ जून रोजी त्या गोऱ्याचाही मृत्यू झाला.

पुन्हा सत्रापूर शिवारापासून अवघ्या अर्ध्या ते एक कि.मी.च्या अंतरावरच असलेल्या बोन्द्री शिवारात दि. १५ जून रोजी फुलचंद चौधरी यांच्या गायीवर भरदिवसा वाघाने हल्ला करीत जखमी केले. सद्या त्या गायीवर उपचार सुरु असून गाय धोक्याबाहेर आहे.

पुन्हा दि.१८ जून रोजी सराखा शिवारात सीताराम तोंडरे रा.सराखा यांच्या गायीवर हल्ला करून जखमी केले.

तर काल पुन्हा दि. १९ जून रोजी रंगराव ठाकूर रा. सत्रापूर यांच्या शेतालगत असलेल्या जंगल परिसरात वाघाने गायीवर हल्ला करून ठार केले. अशाप्रकारे १५- २० दिवसात वाघाने बकऱ्या,गोरे,गाय यांच्यावर हल्ला करीत ६ पशुंना ठार केले. तर २ गाय जखमी असून उपचार घेत आहेत. सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वनविभाग नुकसान भरपाई देणार असले तरी शेतकऱ्यात भीतीचे वातावरण तयार झाले असून वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांत जोर धरत आहे.

वनविभाग व्यक्तीचा बळी जाण्याची वाट पाहत आहे काय.?

दिवसेंदिवस पाळीव प्राण्यांवर होणारे हल्ले पाहून संपूर्ण शेतकरी वर्ग भयभीत झाला असून वन विभागावर आक्रोश व्यक्त करीत आहे. एखाद्या व्यक्तीचा बळी जाण्याची वनविभाग वाट पाहत आहे काय ? असा सवाल गावकऱ्यांनी उपस्थित केला आहे.

नागरिकांनी वनविभागाला सहकार्य करावे. (राहुल शिंदे, वनपरीक्षेत्र अधिकारी,रामटेक )

गावकऱ्यांनी एकटे घराबाहेर पडू नये, रात्रीच्या सुमारास शौचास घराबाहेर पडू नये, हातात काठीचा वापर करावा, जनावरे मोकळ्या ठिकाणी न बांधता गोठ्यात बांधावे,शेतकऱ्यांनी शेतात जातांना टॉर्च,भोंगा यांचा वापर करावा, वाघ वावरणाऱ्या परिसरात सूचनाफलक लावले असून शेतकऱ्यांनी परिसरात भटकू नये व सूचनेचा पालन करून वनविभागाला सहकार्य करण्याचे आव्हान केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button