तुकडोजी कॅन्सर रुग्णालयात सुसज्ज कौशल्य प्रशिक्षण केंद्राचे विभागीय आयुक्तांच्या हस्ते उद्घाटन

नागपूर : मॅकगेल नॉगमॅटिक्स प्रा.लि. च्या सहकार्याने येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कॅन्सर रुग्णालय आणि संशोधन केंद्रात स्थापित सुसज्ज अशा कौशल्य प्रशिक्षण केंद्राचे आज विभागीय आयुक्त तथा कॅन्सर रिलीफ सोसायटीच्या अध्यक्ष विजयलक्ष्मी बिदरी यांच्या हस्ते उद्घाटन झाले.
रुग्णालयाच्या इमारतीत सुसज्जीत कौशल्य प्रशिक्षण केंद्रात आयोजित या कार्यक्रमास मॅकगेल नॉगमॅटिक्स प्रा.लि. चे संचालक तारीत सरकार, कार्यकारी संचालक रतुल चक्रवर्ती, सल्लागार अशोक धर्माधिकारी, कॅन्सर रिलीफ सोसायटीचे उपाध्यक्ष अशोक कृपलानी आणि सचिव अनिल मालवीय आदी उपस्थित होते.
मॅकगेल कंपनीने व्यावसायिक सामाजिक उत्तरदायीत्वाद्वारे (सीएसआयआर) 1 कोटी 4 लाख रुपये खर्चातून तुकडोजी कॅन्सर रुग्णालयात सुसज्ज असे कौशल्य प्रशिक्षण केंद्र उभारण्यात आले आहे. रुग्णालयाच्या प्रशासकीय इमारतीत 2023 पासून या केंद्राच्या बांधकामास सुरुवात झाली. या नूतन केंद्रामध्ये सर्व सोयींनी सुसज्ज अशा दोन वर्ग खोल्या (एकूण 100 विद्यार्थी क्षमतेच्या) आणि कॅफेटेरिया व स्वच्छतागृह आदींचा समावेश आहे.
मॅकगेल कंपनीचे संचालक तारीत सरकार यांनी प्रास्ताविक केले तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कॅन्सर रुग्णालय व संशोधन केंद्राचे उपप्राचार्य डॉ. व्हि.के. शर्मा यांनी आभार मानले.