अन…आता दारुसाठी लिपिकाने भंगारात विकल्या महत्त्वाच्या ५०० किलो फाईल्स:सीजीएसटी विभागात खळबळ
एकीकडे फायलीवर बारमध्ये सह्या, दुसरीकडे फायली भंगारात! शासकीय कार्यालयांत नेमकं सुरू तरी काय?

नागपूर :- नागपूर : नागपूर शहरात दोन दिवसांच्या आत शासकीय कार्यपद्धतीवर मोठा प्रश्नचिन्ह उभा करणाऱ्या दोन धक्कादायक घटना घडल्या आहेत.
मनीष नगरातील एका बिअर बारमध्ये शासकीय फायली घेऊन दारूच्या नशेत एका अधिकाऱ्याने त्या फायलींवर सह्या केल्याचा व्हिडिओ नुकताच व्हायरल झाला होता. ही घटना ताजी असतानाच आणखी एक खळबळजनक प्रकार समोर आला आहे – नागपूरच्या सिव्हिल लाईन्स येथील सीजीएसटी (केंद्रीय वस्तू व सेवा कर) विभागातील एका लिपिकाने दारूच्या पैशासाठी कार्यालयातील जवळपास ५०० किलो शासकीय फाईल्स भंगारात विकल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.या लिपिकाचे नाव मोहित गुंड असून त्याची नेमणूक अनुकंपा तत्त्वावर इंदूर येथून झाली होती. परंतु तो सतत मद्यपान करून कार्यालयात येत असे, तसेच अनेकवेळा गैरहजर राहायचा. त्यामुळे त्याची बदली नागपूर येथे करण्यात आली होती. मात्र इथेही त्याने दारूच्या नशेत कार्यालयातील अनेक महत्त्वाच्या फायली रिक्षामध्ये भरून रद्दीच्या दराने भंगारवाल्याला विकल्या. त्याच्या मोबदल्यात केवळ ५,००० रुपये घेतल्याचे उघड झाले आहे.
फाईल्स गायब असल्याचे लक्षात आल्यानंतर सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. त्यामध्ये मोहित गुंड फाईल्स रिक्षामध्ये नेत असल्याचे स्पष्टपणे दिसून आले. यानंतर संबंधित भंगारवाल्याकडून त्या सर्व फाईल्स परत मिळविण्यात आल्या. घटनेनंतर मोहित गुंड याला तात्काळ निलंबित करण्यात आले आहे.
या दोन घटनांमुळे नागपूरच्या शासकीय कार्यालयांमधील शिस्त, गोपनीयता आणि जबाबदारीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शासकीय फाईल्सचा असा गैरवापर होणं ही केवळ प्रशासकीय नव्हे तर राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टिकोनातूनही चिंतेची बाब आहे. सध्या दोन्ही घटनांमध्ये आंतरिक चौकशी सुरू असून संबंधित अधिकाऱ्यांवर कडक कारवाई होण्याची शक्यता आहे