अंडरवेअरच्या इलास्टिकने गळफास घेत कैद्याने केली आत्महत्या:नागपूर मध्यवर्ती कारागृहात घडलेल्या घटनेने खळबळ

नागपूर: कैद्यांच्या सुरक्षिततेबाबत आणि मानसिक आरोग्याबाबत नागपूर मध्यवर्ती कारागृह पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. एका खून प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या एका कैद्याने तुरुंगाच्या आवारात गळफास घेऊन आपले जीवन संपवले. या घटनेमुळे तुरुंग प्रशासनाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
धंतोली पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मृत कैद्याचे नाव तुळशीराम शेंडे (वय ५४) असे आहे, तो गोंदियाचा रहिवासी आहे. भंडारा येथे दाखल झालेल्या एका खून प्रकरणात त्याला ३० जून २०२४ रोजी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती आणि तेव्हापासून तो नागपूर मध्यवर्ती कारागृहात होता.
तुळशीराम शेंडे हे मध्यवर्ती कारागृहातील ‘छोटी गोल बॅरेक’ जवळ असलेल्या ‘रंग काम विभाग’ च्या गोदामाजवळ खिडकीला लटकलेल्या अवस्थेत आढळले. त्याने त्याच्या अंडरवेअरमधील इलास्टिकचा वापर करून फास बांधल्याचे वृत्त आहे.
या घटनेची माहिती तात्काळ धंतुली पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी अपघाती मृत्यू अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे आणि पुढील तपास सुरू केला आहे. तुलसीरामने हे पाऊल कोणत्या परिस्थितीत उचलले याचा शोध पोलिस घेत आहेत.