बालकांची ही वारी… निघाली लय भारी – आषाढी एकादशीच्या निमित्ताने नागपुरात अवतरले पंढरपूर
पारंपरिक वेशातील 2500 हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग,लेझीम, फुगड्या, रिंगण आणि हरिनामाचा गजर

नागपूर – सकाळी नऊच्या सुमारास एरवी गाड्यांच्या आवाजाने गजबजलेला शंकरनगर चौक शनिवारी अचानक लेझीमचा किणकिणाट आणि हरिनामाच्या गजराने दुमदुमून गेला. विठ्ठल-रखुमाईच्या वेशातील तसेच पारंपरिक वारकरी वेशातील विद्यार्थ्यांच्या चैतन्यमय उपस्थितीने नागपुरात साक्षात पंढरपूर अवतरल्याची भावना प्रत्येकाने व्यक्त केली.
प्रसंग होता, महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायातील संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांचे महान कार्य विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावे, त्यांच्या परंपरा आणि सांस्कृतिक मूल्यांची जाणीव नव्या पिढीत रुजावी, यासाठी शिक्षण विभाग (माध्यमिक), जिल्हा परिषद नागपूर, नूतन भारत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, नागपूर तसेच मराठी ज्ञानसंवर्धन प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आज शनिवारी आयोजित केलेल्या शालेय वारकरी दिंडी. या दिंडीत शहरातील विविध शाळांमधील सुमारे 2500 विद्यार्थी पारंपरिक वारकरी वेशात सहभागी झाले होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष मुधोजीराजे भोसले, विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते यांच्या हस्ते पालखीतील विठ्ठल-रुक्मिणी, संतांच्या प्रतिमांचे व ग्रंथांचे पूजन करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून वारकरी दिंडीला प्रारंभ करण्यात आला.
दिंडीमध्ये विदर्भ साहित्य संघाचे सरचिटणीस विलास मानेकर, शिक्षणाधिकारी (माध्य.) यवतमाळ रविंद्र काटोलकर, ज्ञानेश्वर मंदिराचे अध्यक्ष अशोक गुजरकर, जिव्हाळा ग्रुपचे कार्याध्यक्ष अविनाश संगवई, भारती विद्या प्रसारक संस्थेचे सचिव रमेश बक्षी, सहसचिव अतुल गाडगे, कार्याध्यक्ष समीर महाजन, अतुल गुरू, उमेश अनखिंडी, माजी नगरसेवक दिलीप दिवे, नरेंद्र कुलकर्णी, सती माता शिक्षण संस्थेच्या अध्यक्ष मंदा उमाटे नुतन भारत विद्यालयाच्या मुख्याध्यापिका डॉ. वंदना बडवाईक, यांच्यासह विविध शाळांतील मुख्याध्यापक, शिक्षक दिंडीत सहभागी झाले होते.
पालखीचे पूजन व पुष्पवृष्टी
रेखीव रांगोळ्यांनी प्रसन्न झालेल्या शंकरनगर ते बजाजनगरच्या वाटेवर वाजत-गाजत वारकरी दिंडीत मजल दरमजल करीत पुढे सरकत होती. मुलांमध्ये प्रचंड उत्साहातचे वातावरण होते. ‘विठ्ठला विठ्ला हरीओम विठ्ठला’ च्या तालावर काही मुले-मुली लेझीम खेळत होत्या तर काही जणी फुगड्या घालण्यात दंग होत्या. अखंड हरिनामाचा गजरात निघलेल्या या शालेय वारकरी दिंडींचे ठिकठिकाणी पूजन करण्यात आले व पुष्पवृष्टी करण्यात आली.
ज्ञानेश्वर मंदिरात झाली आरती
या मराठी भाषा, संस्कृती व परंपरेचा जागर करणारी ही बालगोपालांची वारकरी दिंडी बजाजनगर येथील ज्ञानेश्वर मंदिरात पाहोचली. तेथे श्री ज्ञानेश्वराचे पूजन करून आरती करण्यात आली व दिंडीचा समारोप करण्यात आला. त्यानंतर नुतन भारत विद्यालयात महाप्रसाद व सर्व सहभागी शाळांना सन्मानचिन्ह वितरीत करण्याचा कार्यक्रम पार पडला.
विविध शाळांचा सहभाग
या शालेय वारकरी दिंडीत नागपुरातील 23 शाळांनी सहभाग घेतला. त्यात नूतन भारत हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, महाराष्ट्र अध्ययन मंदिर, सेवासदन हायस्कूल, बाबा नानक हायस्कूल, बालाजी हायस्कूल, पंडित बच्छराज व्यास स्कूल, प्रताप नगर, हडस हायस्कूल, धरमपेठ स्कूल, लक्ष्मीबाई वानखेडे हायस्कूल, उमाठे हायस्कूल, मुंडले स्कूल, समर्थ नगर, कुर्वेज हायस्कूल, मानवता हायस्कूल, झुणझुणवाला स्कूल, सनराइज् स्कूल, निंबाळकर हायस्कूल, मूकबधिर विद्यालय, अभिनंदन हायस्कूल, मानवता हायस्कूल, जुपिटर हायस्कूल यांचा समावेश होता. या शाळांमधील 300 हून शिक्षक, मुख्याध्यापक देखील या दिंडीत सहभागी झाले होते.