बारमध्ये बसून दारूच्या नशेत शासकीय फायलींवर सह्या! मनीष नगरातील बिअर बारमधील धक्कादायक प्रकार

नागपूर – नागपूरच्या मनीष नगरातल्या एका बिअर बारमध्ये रविवारी दुपारी घडलेली घटना शासकीय यंत्रणांमधील हलगर्जीपणाचे दर्शन घडवणारी ठरली आहे. सुट्टीचा दिवस, निवांतपणा आणि दारूच्या घोटात शासकीय फायलींवर सह्या केल्या जात असलेल्या दृश्याने बारमधील उपस्थितांना अक्षरशः धक्का दिला.
सुमारे दुपारी ३:३० वाजताच्या सुमारास तीन व्यक्ती मनीष नगरातील एका बिअर बारमध्ये पोहोचल्या. त्यांनी दारूची ऑर्डर दिली आणि लगेचच टेबलावर “महाराष्ट्र शासन” असे ठळकपणे छापलेल्या शासकीय फायलींचा मोठा गठ्ठा ठेवला. नंतर तिघांमध्ये त्या फायलींबाबत गंभीर चर्चा सुरू झाली. काही वेळाने त्यापैकी एकाने नशेत असतानाच त्या फायलींवर भराभर सह्या केल्याचे पाहायला मिळाले. मात्र ही कागदपत्रं नेमकी कोणत्या विभागाशी संबंधित होती?हे स्पष्ट होऊ शकले नाही
सार्वजनिक ठिकाणी, तेही मद्यप्राशनाच्या स्थितीत, शासकीय कागदपत्रांवर सह्या होणे म्हणजे कार्यपद्धतीतील गंभीर दुर्लक्ष आहे. या प्रकाराने उपस्थित ग्राहक, प्रत्यक्षदर्शी नागरिक आणि सामाजिक वर्तुळात संताप व्यक्त केला जात आहे.
प्रशासनाने याची तातडीने दखल घेऊन चौकशी सुरू करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांतून होत आहे. शासकीय कामकाजाची ही ‘दारूतील ढिलाई’ म्हणजे प्रशासनाची प्रतिष्ठा धुळीस मिळवणारा प्रकार असून यावर कठोर कारवाई होणे अत्यावश्यक आहे.