BCI पब्लिशिंग कंपनीची ७६ लाखांची फसवणूक करणारा आरोपी मुंबईतून अटकेत; शालेय पुस्तक रॅकेटचा पर्दाफाश”
नागपूर गुन्हे शाखेची मोठी कामगिरी

नागपूर: – नागपूर शहरातील प्रसिद्ध शालेय पुस्तक प्रकाशन कंपनी बुक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (BCI), नागपूर यांच्याशी तब्बल ७६ लाख रुपयांची फसवणूक उघडकीस आली असून, या प्रकरणात मुंबईतील एका मोठ्या फसवणूक रॅकेटचा भंडाफोड नागपूर गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने केला आहे.
या प्रकरणातील मुख्य आरोपी चिराग काशीनाथ डे (रा. नालासोपारा, जि. पालघर) हा गेल्या एक वर्षापासून फरार होता. नागपूर पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने समुद्रात सुई शोधण्यासारख्या अचूक तांत्रिक तपासामुळे अखेर त्याचा शोध घेऊन त्याला अटक केली. या कारवाईमुळे मुंबई, मीरा-भायंदर, वसई-विरार पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत कार्यरत असलेल्या अशाच प्रकारच्या फसवणूक रॅकेटचे धागेदोरे समोर आले आहेत
या कारवाईदरम्यान पोलिसांना या प्रकरणात आणखी एक गंभीर गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला आरोपी रोशन उर्फ पियुष केशव सिंग सापडला. त्याच्यावर हत्या, हत्येचा प्रयत्न, मारहाण अशा तब्बल ३० ते ३५ गंभीर गुन्ह्यांचे आरोप आहेत. तो देखील नालासोपारा (पूर्व) येथून अटक करण्यात आला असून, या रॅकेटचा एक महत्त्वाचा भाग असल्याचे उघड झाले आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र नाईकवाड व त्यांच्या पथकातील एएसआय परमेश्वर कडू, पो. हवा. चेतन जाधव, गजानन गिरी, सुधीर सौंदरकर, प्रफुल्ल पारधी यांनी अतिशय नेटकेपणाने व तांत्रिक कौशल्य वापरून ही उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे.पाटील