बेलतरोडी तायवाडे नगरातील संरक्षित जागा जलतांडवाचे केंद्र; नागरिक हैराण, प्रशासनाचे दुर्लक्ष!

नागपूर :- बेलतरोडीतील तायवाडे नगर परिसरात कृष्णा हाइट व कुणाल रेसिडेन्सी शेजारील सार्वजनिक उपयोग व उद्यानासाठी राखीव असलेली जागा पावसाळा सुरू होताच संपूर्ण पाण्याखाली जाते. ही स्थिती तब्बल सहा महिने कायम राहते. त्यामुळे परिसरात मच्छर, माशी व इतर जंतूंचा प्रचंड उपद्रव निर्माण होतो.
या जलसाच्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असून, आजारांचे प्रमाणही वाढत आहे. याबाबत नगर पंचायत बेसा-पीपळा यांना वारंवार कळवले गेले असूनदेखील अद्याप कोणतीही ठोस कारवाई झाली नाही. विशेष म्हणजे संबंधित जागेचे मालक बबनराव तायवाडे यांनीही याकडे दुर्लक्ष केल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
स्थानिक रहिवासी प्रशासनाच्या या उदासीनतेमुळे संतप्त असून, त्वरित उपाययोजना न झाल्यास आंदोलनाचा इशारा देत आहेत.
प्रशासनाने लक्ष घालून जलनिकासी व स्वच्छता कामे तातडीने करावीत, अशी मागणी जोर धरू लागली आहे.