भंडारा जिल्ह्यात 24 तासापासून मुसळधार पाऊस:गोसेखुर्द धरणाचे 33 दरवाजे उघडले

भंडारा – विदर्भातील चार जिल्ह्यांमध्ये पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. यात गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्यांचा समावेश आहे. गोसेखुर्द धरणाचे सर्व तेहेतीस दरवाजे अर्ध्या मीटरने उघडण्यात आले आहेत. वैनगंगा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. धापेवाडा धरणाचे तेवीस दरवाजे सध्या उघडलेले आहेत. त्यामुळे या धरणांमधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. मागील चोवीस तासांपासून भंडारा जिल्ह्यात संततधार पाऊस पडत आहे. परिणामी, भंडाऱ्यातील नदी-नाले ओसंडून वाहत आहेत. यामुळे सहापेक्षा अधिक जिल्हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. गोसेखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असल्याने जलसाठा वाढला आहे. आज पहाटेपासूनच धरणाच्या सर्व तेहेतीस दरवाजांमधून सुमारे दोन लाख शहाऐंशी हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. गोसेखुर्द धरणाचे नऊ गेट दीड मीटरने तर चोवीस दरवाजे एक मीटरने उघडण्यात आले आहेत. या परिसरात अनेक घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले होते. भंडारा जिल्ह्यात पुराची परिस्थिती येऊ नये यासाठी प्रशासन आता अलर्ट मोडवर आहे आणि मोठ्या प्रमाणात गेटच्या माध्यमातून पाण्याचा विसर्ग होत आहे. भंडारा जिल्ह्यातील धरणातून होणाऱ्या विसर्गामुळे गडचिरोलीकरांनाही फटका बसत आहे. नागरिकांना पुराचा फटका बसू नये यासाठी गोंदिया आणि गडचिरोलीचे प्रशासन सतर्क असून नागरिकांना खबरदारीच्या सूचना वेळोवेळी देत आहे.