छत्री तलाव येथे वाढदिवस साजरा करणाऱ्या तरुणाला ‘भूतनीने’ केली मारहाण? व्हिडीओ व्हायरल
सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल;नेमकं सत्य काय

अमरावती- अमरावती शहरातील छत्री तलाव परिसरात वाढदिवस साजरा करणाऱ्या तरुणाला भूतनीने मारहाण केल्याचा दावा करणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडीओमुळे खळबळ उडाली असून, अनेकांनी तो शेअर केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ३० जून रोजी वाढदिवस साजरा करणारा तरुण आपल्या मित्रांसह केक घेऊन छत्री तलाव परिसरात गेला होता. त्यावेळी अचानक एक महिला त्याच्यावर धावून गेली आणि त्याला मारहाण केली. संबंधित महिलेला ‘भुतणी’ असल्याचा दावा करण्यात आला आहे. काही फोटोमध्ये तर तरुणाच्या पाठीवर मारहाणीच्या खुणा असल्याचेही दाखवण्यात आले आहे. व्हिडीओमध्ये एक महिला दिसते आणि काही क्षणातच ती गायब होते, असे वर्णनही करण्यात आले आहे.
या प्रकाराबाबत अजूनपर्यंत पोलिसांत कोणतीही तक्रार दाखल झालेली नाही. राजापेठ व खोलापुरी गेट पोलिस ठाण्यांनी अशा कोणत्याही घटनेची माहिती नाकारली आहे. पोलिस उपायुक्त गणेश शिंदे यांनीही अशी घटना घडल्याचे स्पष्टपणे फेटाळले आहे. त्यांनी सांगितले की, हाच व्हिडीओ काही वर्षांपूर्वीही व्हायरल करण्यात आला होता आणि आता तो पुन्हा एकदा व्हायरल केला जात आहे.
दरम्यान, हा प्रकार सध्या शहरात आणि विशेषतः तरुणांमध्ये उत्सुकतेचा विषय ठरला आहे. सोशल मीडियावर त्यावर जोरदार चर्चा सुरू आहे. पोलिस उपायुक्त गणेश शिंदे यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणत्याही व्हिडीओची सत्यता तपासल्याशिवाय तो शेअर करू नये.