दारू साठ्याप्रकरणी शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याच्या ‘एनएच-1’ हॉटेलवर धाड, १५ दिवस बंद ठेवण्याचे पोलिसांचे आदेश

नागपूर | बजाजनगर परिसरातील शिवसेना शिंदे गटाचे शहरप्रमुख मंगेश काशिकर यांच्या ‘एनएच-1’ हॉटेलवर पोलिसांनी कारवाई करत ते १५ दिवस बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. हॉटेलमध्ये अवैधरित्या दारू साठवण्यात आल्याचे उघडकीस आले आहे.
या संदर्भात बजाजनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अजय मानकर यांनी माहिती दिली की, बजाजनगर परिसरातील दोन हॉटेल्सवर तपासणी करण्यात आली होती. तपासणी दरम्यान, दोन्ही ठिकाणी अवैध दारू साठा आढळून आला. या प्रकरणात हॉटेल मालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, ‘एनएच-1’ हॉटेलला १५ दिवस बंद ठेवण्याचे आदेश बजावण्यात आले आहेत.
याआधीही संबंधित हॉटेलमध्ये अशाच स्वरूपाची कारवाई करण्यात आली होती. वारंवार अशा प्रकारच्या घटना घडत असल्याने भविष्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी हा कठोर निर्णय घेतला आहे.
पोलिसांनी दिलेल्या या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली असून, अवैध दारूविक्रीवर पोलिसांचा वचक वाढल्याचे चित्र दिसत आहे.