धकादायक:नागपूरात चमचमीत पदार्थ खाण्यासाठी लहानग्यांनी चोरल्या इतक्या सायकली, सात वर्षाचा पुष्पराज
गरीब घरातील अल्पवयीन मुलांनी पैसे मिळविण्यासाठी नागपुरात तयार केली चक्क सायकलचोरांची टोळी

नागपूरमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे सायकल चोरणारी लहान मुलांची अख्खी गँगच पोलिसांच्या हाती लागली आहे. हे अल्पवयीन गुन्हेगार दुधाचे दातदेखील पडले नाहीत तो चमचमीत पदार्थ व पान ठेल्यांवरील पाकिटाच्या मोहात सायकली चोरू लागले. पोलिसांनी चार मुलांना ताब्यात घेतले असून, त्यांची ही स्टोरी ऐकून पोलीसही अचंबित झाले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे या टोळीतील सर्वात मोठा सदस्य १२ वर्षाचा, तर सर्वात लहान सदस्य सात वर्षांचा आहे. बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
या पोलीस ठाणे परिसरातील नागरीक आशिष उमाटे यांनी मुलासाठी सायकल घेतली होती. ती चोरीला गेल्याने त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली होती. तपासात पोलिसांनी एका सात वर्षाच्या मुलाला चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्याने दिलेल्या माहितीवरून पोलिसांनाच मोठा धक्का बसला. त्या मुलाने चोरीचा पटच उलगडला. त्या मुलासोबत इतर आणखी तीन ते चार साथीदार एकाच शाळेत शिकतात. सर्व मुले गरीब घरांतील असून, कुणाला आईवडील नाही, तर कुणी नातेवाइकांकडे राहून शिक्षण घेत असल्याची माहिती समोर आली आहे.
चोरलेल्या सायकली ही मुलं कवडीमोल भावात विकायची. कधी आईची प्रकृती खालावली आहे असे कारण, तर कधी आजोबा-भाऊ दवाखान्यात भरती केल्याची थाप ते मारायचे. एकदा तर एकाने अभ्यासाची पुस्तके घेण्यासाठी पैसे नसल्याची बतावणी करत त्यांनी पाचशे रूपयांना सायकल विकली.
चमचमीत खाद्य पदार्थांसाठी चोरी
मुलांना अभ्यासात रस नसल्याने ते अनेकदा सोबत शाळेला दांडी मारत. फिरत असताना ते अनेकदा विविध हॉटेल्सशेजारी गेले की तेथील खाद्यपदार्थ पाहून यांचीदेखील इच्छा होत होती. पैसे नसल्याने त्यांनी सायकली चोरायला सुरुवात केली. या प्रकरणात मुलांना समुपदेशन केंद्रात पाठवण्यात आलेल्या मात्र मुलांनी चमचमीत खाद्यपदार्थ खाण्यासाठी केलेला हा प्रकार अनेकांसाठी धक्कादायक आहे.