डोबी नगर रेल्वे ट्रॅकवर गांजा तस्करी करताना दोघांना अटक, मुख्य पुरवठादार फरार:10 किलो गांजा जप्त

नागपूर: गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा शाखेने गुप्त माहितीच्या आधारे मोठी कारवाई करत पाचपांवली पोलिस स्टेशन परिसरातील डोबी नगर, मोती बाग येथे असलेल्या रेल्वे लाईन ट्रॅकजवळ दोन गांजा तस्करांना रंगेहाथ पकडले. आरोपींच्या चौकशीदरम्यान, मुख्य पुरवठादाराचे नावही समोर आले आहे, त्याचा कसून शोध पोलीस घेत आहे
डोबी नगर रेल्वे ट्रॅकजवळ गांजाची सतत तस्करी होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. माहितीची खात्री झाल्यानंतर, सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने घटनास्थळी छापा टाकला आणि नूर मोहम्मद गफूर कुरेशी आणि अभिषेक सुरेश दहिया या दोन आरोपींना गांजासह अटक केली. त्यांच्याकडून सुमारे १० किलो गांजा आणि मोबाईल फोनसह दीड लाख रुपयांचा माल जप्त करण्यात आला.
चौकशीदरम्यान, दोघांनीही हा गांजा डोबीनगर येथील रहिवासी इर्शाद उर्फ इच्छू पीर खान नावाच्या व्यक्तीकडून घेतल्याचे सांगितले. पोलिसांनी आता या मुख्य पुरवठादाराचा शोध सुरू केला आहे. अटक केलेल्या आरोपींना पुढील कारवाईसाठी पाचपावली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.