गाय वाचवण्याच्या प्रयत्नात ट्रक उलटला; चरवाहा आणि गायचा मृत्यू
देवलापार परिसरात अपघात; ट्रक पलटल्याने दोन बळी

नागपूर, रामटेक : नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातील देवलापार पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक दुर्दैवी अपघात घडला. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वर चोरबाहुली गावाजवळ ट्रक उलटून झालेल्या या अपघातात कालू नावाच्या गुराख्याचा आणि एका गायीचा जागीच मृत्यू झाला.
ही घटना सोमवारी घडली. जबलपूरहून नागपूरकडे वाळू घेऊन येणारा ट्रक महामार्गावरून जात असताना अचानक महामार्गाच्या मध्यभागी एक गाय आली. गायेला वाचवण्याच्या प्रयत्नात ट्रकचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि ट्रक रस्त्याच्या कडेला जाऊन उलटला.
या अपघातात गुराख्या कालू आणि गाय यांचा मृत्यू झाला, तर ट्रकचालक आरिफ खान आणि कंडक्टर शोहेल खान यांना किरकोळ दुखापत झाली आहे.
घटनेची माहिती मिळताच देवलापार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला असून ट्रक चालक आणि कंडक्टरला ताब्यात घेण्यात आले आहे.
पुढील तपास देवलापार पोलीस करीत आहे