घरफोड्यांचा पर्दाफाश: नागपूर पोलिसांची कारवाई, मध्यप्रदेशातील तिघे कुख्यात आरोपी अटकेत
नागपूर – शहरात गेल्या काही दिवसांत घडलेल्या घरफोडी व वाहनचोरीच्या घटनांचा अखेर पर्दाफाश करण्यात नागपूर पोलिसांना यश आलं आहे. गुन्हे शाखेच्या घरफोडी विरोधी पथकाने केलेल्या कारवाईत मध्यप्रदेशातील तीन कुख्यात गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे.
अंबाझरी पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा क्रमांक 370/2025 अन्वये तपास सुरू असताना, पोलिसांनी मध्यप्रदेशातील सराईत आरोपी शेरसिंग त्रिलोकसिंग चव्हाण (वय 23), दीपकसिंग केला सिंग बर्नाला (वय 24) आणि प्रकाशसिंग कलमा (वय 20) या तिघांना अटक केली. याअंतर्गत ४ घरफोड्या आणि १ वाहनचोरी अशा एकूण ५ गंभीर गुन्ह्यांचा उलगडा करण्यात आला आहे.
गुन्ह्यात वापरलेली चोरीची युनिकॉर्न मोटारसायकल, रोख रक्कम, सोनं-चांदीचे दागिने, मोबाइल फोन, टॉर्च, व विविध चोरीसाठी वापरली जाणारी साधनं असा एकूण ₹88,200 किमतीचा मुद्देमाल आरोपींकडून जप्त करण्यात आला आहे.
पोलिस तपासादरम्यान आणखी दोन आरोपी — गुरुचरण सिंग जुनेजा आणि मोहनसिंग चावला — यांच्याकडेही चोरीचा ऐवज असल्याची माहिती मिळाली असून, पोलिसांनी त्यांचाही शोध सुरू केला आहे.
तिन्ही आरोपींना वैद्यकीय तपासणीनंतर अंबाझरी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास वेगाने सुरू आहे.




