गोकुल पेठेतील भंगार दुकानात तलवारीने जीवघेणा हल्ला, परिसरात खळबळ
नागपुरात दिवसाढवळ्या हत्या करण्याचा प्रयत्न – आरोपीचा पोलीस शोधात
नागपूर – अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोकुल पेठ परिसरात शुक्रवारी सकाळी एका भंगार दुकानात भरदिवसा मजुरावर तलवारीने हल्ला करून त्याचा जीव घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ‘अग्रवाल कबाडी दुकान’ (युनिअन बँकेजवळ, गोकुल पेठ) येथे काम करणाऱ्या सूरज गुप्ता (वय २६, रा. दंडे हॉस्पिटल मागे) याच्यावर त्याच्याच सहकाऱ्याने – जाहिद अली (रा. मोमिनपुरा, बकरा मंडी, ६० रु. प्रतिघंटा, सुलतानपूर) याने अज्ञात कारणावरून तलवारीने हल्ला केला. ही घटना ५ जुलै २०२५ रोजी सकाळी ९.३० ते १० च्या दरम्यान घडली.
हल्ल्यानंतर आरोपी जाहिद अली घटनास्थळावरून फरार झाला असून, अंबाझरी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमी सूरजला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.
या घटनेचा पोलिसांकडून तपास सुरू आहे. या प्रकरणी गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीचा शोध घेतला जात आहे. हल्ल्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
CCTV फुटेजच्या आधारे तपास सुरू
पोलीस परिसरातील CCTV कॅमेऱ्यांची तपासणी करत असून, आरोपीच्या हालचालींचा मागोवा घेण्याचे काम सुरू आहे. हल्ला पूर्वनियोजित होता की क्षणिक वादातून घडला, याबाबतही सखोल चौकशी केली जात आहे.




