गोंदियाचे वनपरिक्षेत्र अधिकारी दिलीप कौशिक यांच्या अंगावर गौण खनिज माफियांचा जेसीबी चढविण्याचा प्रयत्न
जेसीबी चालक व मालकावर गुन्हा दाखल

गोंदिया – अवैधरित्या सुरू असलेले मुरूम उत्खनन रोखण्यासाठी गेलेल्या गोंदियाचे वनपरिक्षेत्र अधिकारी दिलीप कौशिक यांच्यावर जेसीबी चढविण्याचा प्रयत्न आरोपींनी केला. त्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी जेसीबीचा सिनेस्टाईल 15 ते 20 किमी पाठलाग करून जेसीबी ताब्यात घेतली, मात्र आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले. जेसीबीचालक दिनेश महारवाडे रा. इर्री तर जेसीबीमालक कृष्णा फुंडे रा. खातिया ता. गोंदिया असे फरार आरोपींचे नाव आहे. गोंदियाचे वनपरिक्षेत्राधिकारी दिलीप कौशिक हे त्यांच्या सहकार्यांसह गस्त घालत असताना रात्री दरम्यान गोंदिया तालुक्यातील भदूटोला जंगल परिसरातील वनविभागाच्या राखीव वन गट क्र. 925 मध्ये जेसीबीने झाडेझुडपे तोडून मुरूमाचे खोदकाम करीत असल्याचे वन पथकाच्या निदर्शनास आले. यावेळी जेसीबीचालक व उपस्थित अन्य एकाला उत्खननासंदर्भात वन अधिकार्यांनी विचारणा केली. मात्र त्यांनी मुजोरी करीत उडवाउडवीचे उत्तर दिले. जेसीबीजवळ जाऊन उत्खनन थांबविण्यास म्हटले असता चालकाने जेसीबी वनपरिक्षेत्राधिकारी दिलीप कौशिक यांच्या अंगावर चालविण्याचा प्रयत्न करीत शासकीय कामात अडथळा निर्माण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तथापि वाहनचालक व अन्य एक व्यक्ती जेसीबी घेऊन पळून गेले. यावेळी कौशिक यांनी त्यांच्या सहकार्यांसह 15 ते 20 किमीपर्यंत पाठलाग केला. जेसीबी व आरोपींना पकडण्यासाठी त्यांचा पाठलाग केला. दरम्यान, जेसीबी मशीन खातिया गावाजवळ पकडण्यात आली. यावेळी जेसीबीचालक व त्याचा सहकारी पळून जाण्यात यशस्वी झाले. जेसीबी ताब्यात घेण्यात आली आहे. चालक दिनेश महारवाडे व मालक कृष्णा फुंडे यांच्यावर वन गुन्हा नोंद करण्यात आला आहे.