गोंडवाना चौकात मध्यरात्री खळबळजनक हत्या, पैशाच्या वादातून अज्जू गातेची निर्घृण
३ आरोपी अटकेत, इतरांचा शोध सुरू

नागपूर – शहरातील खदान परिसरातील गोंडवाना चौकात काल मध्यरात्री पैशाच्या वादातून अज्जू गाते नावाच्या तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना रात्री १ वाजताच्या सुमारास ताजुद्दीन रोडवर घडली. या प्रकरणी सदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्राप्त माहितीनुसार, मृत अज्जू गाते याचं नाव यापूर्वीही गुन्हेगारी प्रकरणात आलं होतं. त्याच्यावर २०२१ मध्ये खुनाचा गुन्हा दाखल असल्याची माहिती आहे. काल रात्री त्याचं अनुज कनोजिया या व्यक्तीसोबत पैशावरून वाद झाला होता. या वादानंतर अनुजने आपल्या साथीदार अखिलेश कंगले व आणखी एका व्यक्तीच्या मदतीने अज्जूवर जोरदार हल्ला केला. हल्ल्यावेळी ८ ते १० जणांनी मिळून बेदम मारहाण केल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं.
या घटनेनंतर परिसरात मोठा तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती आटोक्यात आणली. सदर पोलिसांनी अनुज कनोजिया, अखिलेश कंगले व एका साथीदाराला अटक केली आहे. उर्वरित ६ ते ७ आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.
पोलिसांनी या घटनेचा अधिक तपास सुरू केला असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज व स्थानिक साक्षीदारांच्या जबाबांच्या आधारे पुढील कारवाई केली जात आहे.