
देवलापार (ता. रामटेक) – ज्या गाईमुळे स्वतःचे घर चालत होते, त्याच गोमातेची निर्दय कत्तल करून तिचं मांस विकणाऱ्या तिघांना देवलापार पोलिसांनी अटक केली आहे. हे तिघेही गेल्या अनेक वर्षांपासून गो-विज्ञान केंद्राच्या गोशाळेत गुराखी म्हणून कार्यरत होते.
आरोपींची नावे — अनिल वासुदेव वरठी (३२), रामू युवराज ठाकरे (३२), आणि सोनू निर्मलदास सारवा (२४), तिघेही न्यू तोतलाडोह (रयतवाडी), ता. रामटेक येथील रहिवासी आहेत. अनिल व रामू हे दोघे पाच ते सहा वर्षांपासून गो-विज्ञान केंद्रातील गाई चराईच्या कामावर होते.
१३ जुलै रोजी दुपारी ३.३० वाजता ही घटना उघडकीस आली. गोशाळेतील कर्मचाऱ्यांना संशयास्पद हालचाली दिसल्याने त्यांनी पोलिसांना माहिती दिली. देवलापार पोलीस स्टेशनचे ठाणेदार नारायण तुरकुंडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने अनिलच्या घरी छापा टाकला असता, तेथे गोमांस साठवलेले आढळले. अनिलने पळ काढण्याचा प्रयत्न केला, परंतु पोलिसांनी तिघांनाही ताब्यात घेतले.
अंततः चौकशीत तिघांनी मिळून गोशाळेतील एक वासरू (छोटा नंदी) कापल्याची कबुली दिली. पोलिसांनी अनिलच्या घरी १५ किलो गोमांस, एक कत्तल सुऱा व इतर अवजारे जप्त केली.
या प्रकरणात देवलापार पोलिसांनी तिघांविरुद्ध कलम ५(क), ९(अ), ९(ब) महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम १९७६, तसेच कलम ३२५ व ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल केला असून, तिघांनाही न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने तिघांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली असून, त्यांना नागपूर जिल्हा मध्यवर्ती कारागृहात हलवण्यात आले आहे.
हा प्रकार समजताच संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली असून, गोशाळेतील कर्मचारी आणि स्थानिकांनी आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.