हप्ता वसुलीसाठी चाकूने हल्ला; “मी गुंड आहे” म्हणत हप्ता मागणाऱ्या आरोपीला अटक

नागपूर – जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत हप्ता वसुलीसाठी धमकावणाऱ्या आणि चायनीज सेंटरवर चाकूने हल्ला करणाऱ्या गुन्हेगाराला पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव पुणेश गुलाबसिंग ठाकरे असून, त्याच्यावर यापूर्वी खुनाचा आणि फायरिंगसारख्या गंभीर गुन्ह्यांचे प्रकरणे दाखल आहेत.
सौरभ सुरेंद्र एलमकर हे मंगळवारी बाजार परिसरात चायनीज सेंटर चालवतात. आरोपी पुणेश ठाकरे याने स्वत:ला “मी गुंड आहे, माझ्यावर फायरिंगसारखे गुन्हे आहेत” असे सांगत धमकावून दरमहा ५०० रुपयांचा हप्ता मागितला होता. गेल्या तीन महिन्यांपासून आरोपी वारंवार हप्ता वसूल करण्यासाठी येत होता. मात्र फिर्यादीने पैसे देण्यास नकार दिला होता.
२४ जून रोजी देखील आरोपीने चायनीज ठेल्यावर जाऊन हप्ता मागितला आणि न दिल्याने ठेला उलथवून दिला. या घटनेबाबतही पोलिसांकडे तक्रार देण्यात आली होती. मात्र काल आरोपी पुन्हा आला आणि यावेळी थेट २ हजार रुपयांची मागणी करत चाकू काढून चायनीज गाडीवर वार केला.
या प्रकाराने घाबरलेले फिर्यादीने थेट पोलीस ठाणे गाठले. त्यावरून पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.