काल भैरव परिसरात पुन्हा वाघाचा हल्ला; दोन दिवसांत दुसऱ्या गुरख्याचा मृतदेह सापडला, परिसरात भीतीचं वातावरण

नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी वनपरिक्षेत्रातील काल भैरव परिसरात पुन्हा एकदा वाघाच्या हल्ल्याची घटना समोर आली आहे. रविवारी सकाळी पेठ परसोडी येथील ५५ वर्षीय मधुकर बापूराव राऊत याचा मृतदेह जंगलात आढळून आला. दोन दिवसांत ही दुसरी घटना असून, त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
शुक्रवारी हेटीखेडा येथील दिनेश खंडाते याचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. अद्याप त्याच्या हल्ल्याची चौकशी पूर्णही झाली नसताना, रविवारी पुन्हा अशीच घटना घडल्याने वनविभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.
मधुकर राऊत रविवारी सकाळी मवेशी चारण्यासाठी जंगलात गेला होता. मात्र, तो घरी परतला नाही. त्यानंतर कुटुंबियांनी शोधाशोध सुरू केली असता, काल भैरवच्या जंगलात त्याचा मृतदेह आढळून आला. वनविभाग व पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला आणि मृतदेह पारशिवनी उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.