कळमना एपीएमसीला ‘राष्ट्रीय बाजार समिती’चा दर्जा द्या!” – डॉ. आशीषराव देशमुख यांची विधानसभेत जोरदार मागणी

मुंबई येथे सुरू असलेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात सावनेर-कलमेश्वरचे आमदार डॉ. आशीषराव देशमुख यांनी नागपूरच्या कलमना कृषी उत्पन्न बाजार समिती (APMC) ला ‘राष्ट्रीय बाजार समिती’ चा दर्जा देण्याची जोरदार मागणी केली.
डॉ. देशमुख यांनी लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून विधानसभेत बोलताना सांगितले की, “कलमना एपीएमसी ही केवळ विदर्भ नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक महत्त्वपूर्ण कृषी व्यापार केंद्र आहे. येथे दरवर्षी 3,500 कोटी रुपयांहून अधिक आर्थिक व्यवहार होतात आणि देशभरातील मालाची आवक येथे होते. त्यामुळे या मंडीला राष्ट्रीय बाजार समितीचा दर्जा मिळाला पाहिजे.”
त्यांनी स्पष्टपणे म्हटले की, “कलमना मंडीतील भ्रष्टाचार आणि राजकीय हस्तक्षेप संपवून, हा बाजार प्रशासनाच्या देखरेखीखाली आणणे आवश्यक आहे. तसेच, शेतकऱ्यांना थेट मतदानाचा अधिकार मिळावा आणि त्यांच्या हितासाठी पारदर्शक व्यवस्था निर्माण व्हावी.”
या मागणीला उत्तर देताना मा. पणन मंत्री जयकुमार रावल यांनी विधानसभेत सांगितले की, “शेतकऱ्यांचे कल्याण ही महायुती सरकारची सर्वोच्च प्राधान्यक्रम आहे. जर कलमना बाजार समिती योग्य निकषांवर खरी उतरली, तर त्याला ‘राष्ट्रीय बाजार’ म्हणून घोषित करण्यासाठी सरकार सकारात्मक विचार करेल.”
डॉ. देशमुख यांनी 2017 पासून लागू करण्यात आलेल्या नव्या APMC मॉडेल अॅक्टचा संदर्भ देत, शासनाला कलमना मंडी पायलट प्रोजेक्ट म्हणून निवडण्याची विनंती केली.