कन्हान पुलावरून युवकाची नदीत उडी; SDRF चा शोधमोहीम सुरू

कन्हान : नवीन कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या जबलपूर महामार्गावरील कन्हान नदी पुलावरून एका युवकाने उडी घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली असून, SDRF (राज्य आपत्ती प्रतिसाद दल) कडून शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे.
उडी मारणाऱ्या युवकाचे नाव राहुल मते (वय ३२) असे असून तो विरसी मौदा येथील रहिवासी आहे. त्याने आपल्या मोटरसायकलला पुलावरच बाजूला लावून नदीत झेप घेतली. घटनेची माहिती मिळताच नवीन कामठी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली व एसडीआरएफ पथकास पाचारण करून शोधकार्य सुरू केले आहे.
सध्या कन्हान नदीचा पाणी पातळी मोठ्या प्रमाणात वाढलेली असल्याने शोधकार्यास अडथळे येत आहेत.विशेष म्हणजे, याच पुलावर काही दिवसांपूर्वी एका महिलेनं आपल्या पतीसह कारमधून येऊन गळफास घेऊन आत्महत्या केली होती. सलग अशा घटना घडल्याने या पुलावर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
पोलीस पुढील तपासात व्यस्त असून युवकाने उडी का घेतली, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.