“लकडगंजमध्ये थरार! जुन्या वैरातून तरुणाची निर्घृण हत्या; अवघ्या काही तासांत चार आरोपी गजाआड”

नागपूर – लकडगंज परिसरातून एक थरारक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. जुन्या वैरातून चार जणांनी मिळून एका तरुणाची चाकूने सपासप वार करत निर्घृण हत्या केली. ही घटना २७ जुलै रोजी रात्री ११.४५ ते १२.०१ दरम्यान घडली. अवघ्या काही तासांत नागपूर पोलिसांनी चारही आरोपींना अटक करत प्रकरणाचा तपास झपाट्याने पुढे नेला आहे.
मृत तरुणाचे नाव हर्षल अनिल सौदागर (वय २६) असे असून तो लकडगंजमधील लाल प्रायमरी स्कूलजवळ राहत होता. गुन्ह्याच्या मागे जुन्या वैराला कारणीभूत ठरवले जात आहे.
या घटनेनंतर हर्षलच्या काकांनी सुधीर सौदागर यांनी लकडगंज पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करत भारतीय दंड विधानाच्या कलम १०३ आणि ३(५) अंतर्गत गुन्ह्याची नोंद केली.
लकडगंज पोलिस, गुन्हे शाखा आणि घरफोड गँगच्या संयुक्त पथकाने केवळ काही तासांत सर्व आरोपींना अटक केली. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू असून, हत्येचा नेमका उद्देश आणि आरोपींचे आणखी कोणते संबंध आहेत का, याचा शोध घेतला जात आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी प्रज्वल उर्फ फारूख नामदेव कानारकर, प्रज्वल उर्फ पज्जू डोरले, वैभव उर्फ कंडोम हेडाऊ आणि राहुल उर्फ दद्या शेटे – या चौघांनी हर्षलसोबत वाद घातल्यानंतर त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात हर्षलचा जागीच मृत्यू झाला.