महिला अधिकारीला वारंवार फोनवर मॅसेज करून व पाठलाग करून त्रास देणाऱ्या गोंदिया जि.प. च्या एका अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल
घराची रेकी करून दारातून आत पैसे टाकत असल्याचाही आरोप

गोंदिया :- गोंदिया जिल्हा परिषदेच्या एका कनिष्ठ प्रशासन महिला अधिकाऱ्याने आपल्या विभागातील वरिष्ठ सहायकाविरोधात गोंदिया ग्रामीण पोलिसांत गंभीर तक्रार दाखल केली. त्या कर्मचाऱ्याने वारंवार फोन व मेसेज करून तिचा पाठलाग करीत त्रास देण्याचा सपाटा लावल्याचे ४२ वर्षीय महिला कनिष्ठ प्रशासन अधिकाऱ्याने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. तसेच घराची रेकी करून बंद दरवाज्यातून आत मध्ये पैसे टाकत असल्याचाही आरोप या महिला अधिकाऱ्याने केला आहे. याप्रारणी महिला अधिकारीच्या तक्रारीवरून आरोपी वरिष्ठ सहायक भूपेंद्र रणदिवे (५२) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. आरोपी अधिकारी आणि फिर्यादी महिला हे गोंदिया जिल्हा परिषदेमध्ये कार्यरत असून यादरम्यान अधिकाऱ्याने फिर्यादी महिलेला विविध माध्यमातून त्रास दिला व घराची रेकी करून पैशाची गरज असल्यास पैसे देतो असे म्हणत बंद असलेल्या घराच्या दरवाजातून आत मध्ये पैसे टाकले. त्यामुळे महिलेने शेवटी गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी गोंदिया ग्रामीण पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम 78 (2), 356 (3) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे