नागपूर पूर्व RTO मध्ये दलालशाहीचा पर्दाफाश:लाच घेताना व्हिडीओ आला समोर

नागपूर – नागपूरच्या पूर्व उपप्रादेशिक परिवहन (RTO) कार्यालयात दलालशाही व लाचखोरीचे गंभीर प्रकार समोर आले असून, मनसेने याविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. या कार्यालयात पैसे दिल्याशिवाय कोणतेही काम होत नसल्याचा आरोप मनसेचे पदाधिकारी आदित्य दुरुगकर यांनी केला आहे.
मनसेच्या म्हणण्यानुसार, जर कोणी फॉर्म भरून स्वतः कार्यालयात गेला, तर त्याचे काम होत नाही. मात्र दलालामार्फत गेले, तर लवकरात लवकर काम पूर्ण केले जाते. एवढंच नव्हे तर, काम पूर्ण होण्यासाठी किती पैसे द्यायचे, यासाठी कागदावर ‘रेषा’ मारल्या जातात आणि त्या आधारे रक्कम ठरवली जाते, असा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
याच प्रकरणाचा एक व्हिडीओ सुद्धा समोर आला आहे, ज्यात कार्यालयात पैसे घेताना काहीजण स्पष्ट दिसत असल्याचे मनसेने सांगितले. या संदर्भात त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन, तक्रारीचे पुरावेही दिले असून, सात दिवसांत कारवाई झाली नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील दिला आहे.
मनसेकडून करण्यात आलेले हे आरोप परिवहन खात्यासाठी गंभीर असल्याने आता संबंधित प्रशासनाची पुढील भूमिका काय असते, याकडे नागपूरकरांचे लक्ष लागले आहे.