नागपुरात गोकुळपेठ व सदरमधील बेकायदेशीर हुक्का पार्लरवर छापे,दोन्ही ठिकाणे सील:ऑपरेशन थंडर अंतर्गत कारवाई

नागपूर – नागपूर शहर पोलिसांनी “ऑपरेशन थंडर” अंतर्गत बेकायदेशीररित्या सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर मोठी कारवाई केली आहे. गोकुळपेठमधील ‘Shosha’ आणि सदरमधील ‘The Hub’ या दोन ठिकाणी छापे टाकून हुक्का साहित्य जप्त करण्यात आले असून दोन्ही पार्लर सील करण्यात आले आहेत.
ही कारवाई पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. नागपूरमध्ये हुक्कावर पूर्णतः बंदी असूनही, या दोन्ही ठिकाणी खुलेआम ग्राहकांना हुक्का पुरवला जात होता. याशिवाय, The Hub मध्ये अनधिकृत बांधकाम असल्याचाही पोलिसांनी उल्लेख केला आहे.
हुक्काचा वापर आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक आहे. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, एक तास हुक्का ओढल्यास सुमारे १०० सिगारेटइतका धूर शरीरात जातो. यातून निकोटीन, कार्बन मोनोऑक्साईड आणि कर्करोगजन्य रसायन शरीरात जाऊन फुफ्फुस, मेंदू आणि हृदयाला गंभीर इजा पोहोचवतात.
पोलिसांनी ग्राहकांची नोंद घेऊन चौकशी सुरू केली असून अशा प्रकारच्या अनधिकृत पार्लरवर कारवाई सातत्याने सुरू राहणार असल्याचे पोलीस आयुक्त डॉ. सिंगल यांनी स्पष्ट केले आहे.
“नियम तोडणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल,” असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.