नागपुरात २० लाखांचा पानमसाला आणि तंबाखू जप्त; एक आरोपी अटकेत

नागपूर – वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत बंदी असलेला सुगंधित पानमसाला व तंबाखूच्या मोठ्या साठ्यावर पोलिसांनी छापा टाकत मोठी कारवाई केली. गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई पोलिसांच्या सर्व्हेलन्स पथकाने केली.
मिळालेल्या माहितीनुसार, एम.एच. ४० बी.एल. ७५२३ क्रमांकाच्या टाटा ट्रकमधून वाडी परिसरात बेकायदेशीररित्या बंदी घालण्यात आलेल्या पानमसाल्याची वाहतूक होत होती. खडगाव रोडवरील प्रविन रोडलाईन्सच्या गोडाऊनजवळ छापा टाकून पोलीस पथकाने ट्रकमधून माल उतरवणाऱ्या लोकांना पकडले. ट्रक चालक अफसर अली सय्यद (४१, रा. बालाघाट, मध्यप्रदेश) याला ताब्यात घेण्यात आले.
या ट्रकमधून राजनिगंधा पानमसाल्याचे ५२८ पॅकेट्स (७४.६८८ किलो) आणि विमल पानमसाल्याचे १६६४ पॅकेट्स (९९.८४ किलो) असा एकूण १७४.५२८ किलो प्रतिबंधित माल सापडला, ज्याची बाजारभावातील किंमत अंदाजे ₹५,०४,९६०/- इतकी आहे. यासोबतच ₹१५ लाख किंमतीचा ट्रक देखील जप्त करण्यात आला आहे.
एकूण ₹२०,०४,९६०/- किमतीचा प्रतिबंधित माल व वाहन जप्त करण्यात आले असून, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईचे नेतृत्व पोलीस उपनिरीक्षक अमित बंडगर करत असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.