नागपुरात वाहन चोरांचा पर्दाफाश; 29 गुन्हे उघडकीस, १३.५० लाखांचे २७ दुचाकी जप्त

नागपूर – शहरात सातत्याने होणाऱ्या वाहन चोरीच्या घटनांवर रोक बसवण्यासाठी गुन्हे शाखा युनिट ३ ने मोठी कामगिरी बजावली आहे. पोलिसांनी दोन शातिर वाहन चोरांना अटक करून त्यांच्या ताब्यातून एकूण २७ दुचाकी जप्त केल्या आहेत. या वाहनांची एकूण किंमत सुमारे १३ लाख ५० हजार रुपये इतकी असून, एकूण २९ चोरीप्रकरणांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे.
ही कारवाई २५ मे २०२५ रोजी लकडगंज पोलिस ठाण्याच्या हद्दीत राजेश राजू सुतार यांची हिरो स्प्लेंडर दुचाकी चोरी गेल्यानंतर सुरू करण्यात आली होती. या प्रकरणात पोलिसांनी अज्ञात चोराविरुद्ध तक्रार नोंदवली होती. त्यानंतर गुन्हे शाखेच्या युनिट ३ च्या अधिकाऱ्यांनी तांत्रिक तपास व गुप्त माहितीच्या आधारे दोन संशयितांना ताब्यात घेतले.
पोलिसांनी या प्रकरणात एकूण २७ दुचाकी जप्त केल्या असून, आरोपींना पुढील कारवाईसाठी लकडगंज पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. या यशस्वी ऑपरेशनमध्ये पोलिस निरीक्षक अनिल तकसांडे, उपनिरीक्षक मधुकर काठोके आणि युनिट ३ च्या संपूर्ण पथकाचे महत्त्वपूर्ण योगदान लाभले. अधिक तपास सुरू आहे.