निर्माल्य टाकण्यासाठी नदीच्या पुलावर कार थांबवली; क्षणात पत्नीने नदीत उडी घेत संपवलं जीवन, पतीच्या डोळ्यादेखत दुर्दैवी अंत!
पत्नीसोबतचा अखेरचा सेल्फी, घटनेतील अत्यंत वेदनादायक पैलू

नागपूर जिल्ह्यातील कन्हान नदीवरील नेरी पुलावर शनिवारी दुपारी घडलेल्या एका विचित्र घटनेने सर्वत्र एकाच खळबळ उडाली आहे. यात कन्हान नदीवरील नेरी पुलावरुन जात असताना एका दाम्पत्याने निर्माल्य टाकण्यासाठी कार थांबवली. त्यानंतर क्षणात यातील 23 वर्षीय महिलेने अचानक पुलावरून नदीत उडी (Nagpur Crime) मारली. रामटेक तालुक्यातील काचूरवाही गावातील रहिवासी ज्ञानेश्वरी विजय साकोरे (वय 23) असे महिलेचे नाव असून त्या सध्या नागपूरच्या मानेवाडा येथे पती विजय साकोरेसोबत राहत होत्या. काही कळायच्या आत ही घटना घडल्याने पतीच्या डोळ्यादेखत ज्ञानेश्वरीने आपली जीवनयात्रा संपवली. या घटनेमुळे मात्र सर्वत्र खळबळ उडाली आहे.
पतीच्या डोळ्यादेखत पत्नीचा दुर्दैवी अंत!
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी 3 वाजताच्या सुमारास साकोरे दाम्पत्य कारमधून काचूरवाही गावाकडे जात होते. या दरम्यान कार कन्हान नदीच्या नेरी पुलावर आली असता निर्माल्य टाकण्यासाठी कार थांबली आणि त्यानंतर दोघांनी सोबत काही वेळ त्या पुलावर घालवला. या दरम्यान दोघांनी मोबाईलवर सेल्फी देखील घेतला. मात्र, काही क्षणात ज्ञानेश्वरीने अचानक पुलावरून नदीत उडी मारली. हे दृश्य पाहताच पती विजय साकोरे यांना आश्चर्याचा जबर धक्का बसला. त्यांनी आरडाओरडा केला. मात्र जवळपास कुणीही नसल्याने कुठलीही मदत मिळू शकली नाही. नंतर उशिरा घटनेची माहिती मिळताच नवीन कामठी पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
पत्नीसोबतचा अखेरचा सेल्फी, घटनेतील अत्यंत वेदनादायक पैलू
दरम्यान, पोलिसांनी स्थानिक गोताखोरांच्या मदतीने तात्काळ शोधमोहीम राबवली. बऱ्याच काळ शोध घेऊनही ज्ञानेश्वरीचा शोध लागला नाही. अखेर सायंकाळ होताच अंधार पडल्यामुळे शोधकार्य थांबवावे लागले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी रविवारी सकाळपासून पुन्हा एकदा शोधकार्य सुरू करण्यात आलं. एकंदरीत या प्रकरणात ज्ञानेश्वरीने एवढं मोठं टोकाचं पाऊल नेमकं का उचललं? आणि त्यामागील सत्य काय? हे अद्याप कळू शकलेलं नाही. सध्या पोलीस त्या दिशेने तपास करत आहे.मात्र या धक्कादायक घटनेमागे कौटुंबिक वाद कारणीभूत असावा, अशी चर्चा आता रंगू लागली आहे. सध्या पोलिसांनी विजय साकोरे याचाही जबाब नोंदवला असून पुढील तपास कामठी पोलीस करत आहेत.