पावसामुळे आज, ९ जुलै रोजी नागपूर जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांना सुट्टी
जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांचे आदेश

नागपूर: मागील दोन दिवसापासून नागपूर जिल्ह्यात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून काही ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. याची दखल घेत जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. विपिन इटनकर यांनी ९ जुलै २०२५ रोजी नागपूर जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये व खासगी शैक्षणिक संस्थांना सुट्टी जाहीर केली आहे.
भारतीय हवामान विभागाच्या इशाऱ्यानंतर प्रशासन सतर्क झाले असून, सततच्या पावसामुळे काही भागांत पाणी साचणे, वाहतूक खोळंबणे व नागरिकांच्या सुरक्षेचा मुद्दा निर्माण झाला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे.
सदर आदेश नागपूर महानगरपालिका क्षेत्रासह संपूर्ण जिल्ह्यासाठी लागू असणार आहे. जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा, महाविद्यालये तसेच खासगी शैक्षणिक संस्था यांना आज सुट्टी असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
जिल्हा प्रशासनाने नागरिकांना आवश्यक खबरदारी घेण्याचे आणि अनावश्यक प्रवास टाळण्याचे आवाहन केले आहे