पूर्व नागपूर NIT कार्यालयात मनसेचा संताप! भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अभियंत्याच्या तोंडावर फेकली शाई, नागपुरात खळबळ

नागपूर – नागपूर सुधार प्रन्यास NIT मध्ये भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) कार्यकर्त्यांनी गुरुवारी मोठा गोंधळ घातला. पूर्व नागपूर विभागात कार्यरत स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक सुरेश चव्हाण यांच्यावर मनसेने थेट कारवाई करत त्यांच्या तोंडावर काळी शाई फेकली आणि काळा हार घालून निषेध नोंदवला.
सुरेश चव्हाण यांच्यावर 2014 पासून नासुप्रमध्ये भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप होत असून, प्लॉट पट्टा मंजुरीसाठी २५ हजार रुपये आणि डिमांड नोटसाठी १२ लाखांची मागणी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. 2023 मध्ये मनसेने भ्रष्टाचारविरोधी मोर्चा काढून नासुप्र प्रशासनाला दस्तऐवजी पुरावे सादर केले होते. त्यानंतर चव्हाण यांची बदली दक्षिण नागपूर विभागात करण्यात आली होती.
मात्र, अलीकडेच त्यांची पुन्हा पूर्व विभागात नेमणूक करण्यात आली, ज्यामुळे मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये संताप उसळला. त्यांनी कार्यालयात घुसून घोषणाबाजी करत तोंडावर शाई फेकत निषेध केला.
ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून, तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
दरम्यान, नासुप्र प्रशासन आणि पोलिसांनी घटनेची दखल घेत चौकशी सुरु केली आहे.