पूर्व विदर्भात आज धुव्वाधार पाऊस बरसणार; हवामान खात्याकडून हाय अलर्ट जारी; शाळा, कॉलेजला सुट्टी जाहीर, हवामान खात्याच्या अंदाज
पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यासाठी नागपूर वेध शाळेने रेड अलर्ट जाहीर केला आहे. तर नागपूर आणि वर्धा या दोन जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय.

राज्यासह विदर्भात देखील दमदार पावसाच्या सरी (Rain) कोसळत आहे. अशातच मधल्या काळात विश्रांती घेतलेल्या धुव्वादार पावसाने पुन्हा एकदा आगमन केलं असून येथील विविध जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झालं आहे. अशातच आज (25 जुलै) पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यासाठी नागपूर वेध शाळेने (IMD) रेड अलर्ट जाहीर केला आहे. तर नागपूर आणि वर्धा या दोन जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. संभाव्य इशारा लक्ष्यात घेता नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, अशा सूचना प्रशासना मार्फत देण्यात आल्या आहेत.
भंडाऱ्यात आज शाळा, महाविद्यालयांना सुट्टी, नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना
भंडारा जिल्ह्याला आज (25 जुलै) हवामान विभागानं पावसाचा रेड अलर्ट दिलाय. तसेच मुसळधार ते अतीमुसळधार पावसाची शक्यता असल्यानं जिल्हा प्रशासनानं जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी, शाळा, महाविद्यालयांना सुट्टी घोषित केली आहे. तर, नदी काठावरील गावातील नागरिकांना खबरदारीच्या सुचना देण्यात आल्या आहेत. काल (24 जुलै) दुपारपासून भंडारा जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस बरसतोय. रात्री थोडी उसंत घेतली असली तरी, पहाटेपासून पुन्हा पावसानं जोर धरला आहे.
चंद्रपूर जिल्ह्याला रेड अलर्ट, प्रशासनाच्या वतीने काळजी घेण्याचे आवाहन
चंद्रपूर जिल्ह्याला हवामान खात्याने पावसाबाबत दिलेल्या रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्ह्यातील हि शाळा- महाविद्यालय, खाजगी कोचिंग क्लासेस, अंगणवाड्याना सुटी जाहीर करण्यात आली आहे. प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे यांनी हे आदेश जारी केला आहे. तर कुठलीही अप्रिय घटना टाळण्यासाठी सुटीचा आदेश जारी केला असून नागरिकांनी योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने नागरिकांना करण्यात आले आहे.