प्रिया फुके पोहोचल्या राज ठाकरे यांच्या भेटीला,न्यायासाठी अखेर मनसेची वाट धरली
प्रिया फुके आपल्या लहान मुलाला घेऊन राज ठाकरे यांच्या निवासस्थानाबाहेर

विधानभवनाबाहेर आंदोलन केल्यानंतर आता भाजप आमदार परिणय फुके यांच्या भावजयी प्रिया फुके यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
प्रिया फुके आपल्या लहानग्या मुलाला घेऊन थेट राज ठाकरे यांच्या शिवाजी पार्क येथील निवासस्थानाबाहेर पोहोचल्या. भर पावसातही त्या मुलासह उभ्या होत्या. मात्र, त्यांची अद्याप राज ठाकरे यांच्याशी प्रत्यक्ष भेट झालेली नाही. राज ठाकरे यांच्या कार्यालयातून अधिकृत अपॉइंटमेंट घेऊनच भेट दिली जाणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.
प्रिया फुके यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की, “मला अनेक लोकांनी मेसेज व कमेंट्स करून सांगितलं की, राज ठाकरे मला न्याय देऊ शकतात. म्हणून मी त्यांच्या भेटीसाठी आले आहे.”
त्याचप्रमाणे आपल्या सासूबाईंचा उल्लेख करत प्रिया म्हणाल्या की, “सासूबाई म्हणाल्या हे एक राजकीय स्टंट आहे,
पण असं काही नाही. मला केवळ न्याय पाहिजे आहे आणि जोपर्यंत तो मिळत नाही, तोपर्यंत मी लढत राहणार आहे.”
या घडामोडींमुळे प्रिया फुके प्रकरणाने आता राजकीय वळण घेतले आहे. प्रिया फुके यांचे आरोप, आंदोलने आणि आता राजकीय नेत्यांची भेट यामुळे प्रकरणात नवा कलाटणी मिळण्याची शक्यता आहे