रामटेक गडावर मोठी कारवाई! तीन मजार हटवल्या, संपूर्ण परिसर पोलिस छावणीत रुपांतरित

रामटेक तहसीलमधील ऐतिहासिक रामटेक गड मंदिर परिसरात बुधवारी पहाटे वन विभाग व पोलीस प्रशासनाने संयुक्तपणे मोठी कारवाई करत वनजमिनीवरील अवैध तीन मजार हटवल्या. ही कारवाई पहाटे ४ ते ५ दरम्यान गुप्तपणे पार पडली.
सूत्रांच्या माहितीनुसार, गेल्या अनेक वर्षांपासून या मजार वनजमिनीवर अनधिकृतरित्या उभ्या होत्या. याआधी संबंधित विभागाने नोटिसा पाठवल्या होत्या, मात्र उत्तर न मिळाल्यामुळे प्रशासनाने थेट कारवाई करण्याचा निर्णय घेतला.
कारवाईदरम्यान संपूर्ण रामटेक शहर पोलिस छावणीत रूपांतरित झाले होते. मंदिराकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यांवर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. प्रसारमाध्यमांनाही मंदिर परिसरात जाण्यास मज्जाव करण्यात आला होता.
कारवाईनंतर काही वेळासाठी मंदिरात भाविकांची प्रवेश बंद करण्यात आली होती. मात्र, नंतर मंदिर सामान्य भाविकांसाठी खुलं करण्यात आलं. सध्या परिसरात अजूनही सुरक्षा यंत्रणा तैनात असून परिस्थितीवर प्रशासन बारकाईने लक्ष ठेवून आहे.
स्थानिकांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया
या घटनेमुळे परिसरात चर्चेला उधाण आलं आहे. काही नागरिकांनी प्रशासनाची कठोर कारवाई व कायदा-सुव्यवस्थेची अंमलबजावणी म्हणून ही पावलं योग्य ठरवली, तर काहींनी धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत निषेध व्यक्त केला आहे.
सध्या पर्यंत प्रशासनाकडून अधिकृत निवेदन देण्यात आलेले नाही. तथापि, सामाजिक व राजकीय संघटनांच्या प्रतिक्रियांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.